-संदीप नऱ्हेराव यांचे वासरू बिबट्याने फाडल्याची माहिती; दीपक वायाळ यांच्या शेतातही वावर, वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश गायकवाड यांची घटनास्थळी भेट
देऊळगाव राजा (सुरेश हुसे) : तालुक्यातील चिंचखेड, खळ्याळ गव्हाण आणि परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतीची कामे करण्यासाठी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, चिंचखेड येथील शेतकरी संदीप नऱ्हेराव यांचे वासरू बिबट्याने फाडल्याची माहिती समोर आली असून, या घटनेमुळे पशुपालकांमध्येही चिंता वाढली आहे.
याच परिसरातील दीपक वायाळ यांच्या शेतातही बिबट्याचा वावर असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. त्यामुळे शेतकरी आपल्या जनावरांच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्क झाले आहेत. बिबट्याच्या वावराची माहिती मिळाल्यानंतर १५ सप्टेंबर रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश गायकवाड, देऊळगाव राजा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांकडून बिबट्याच्या हालचालींबाबत माहिती घेतली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून परिसरात गस्त घालण्यात येत असून, बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. बिबट्या दिसल्यास नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षित अंतर राखावे आणि तातडीने वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. चिंचखेड व परिसरातील अनेक शेतकरी शेतीसोबत पशुपालनाचा व्यवसाय करतात. त्यामुळे बिबट्याचा वावर वाढल्याने जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वासरावर हल्ला झाल्याची माहिती समोर आल्यानंतर शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. पहाटे व सायंकाळच्या वेळी शेतात जाताना शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी. शक्यतो एकट्याने शेतात न जाता समूहाने जावे. रात्रीच्या वेळी शेतशिवारात जाताना सावधगिरी बाळगावी आणि पाळीव जनावरे सुरक्षित व बंदिस्त गोठ्यात ठेवावीत, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.
अचानक बिबट्या दिसला तर काय कराल?
बिबट्याचा वावर असलेल्या क्षेत्रातील रहिवाशांनी पुढील बाबी लक्षात ठेवाव्यात :
बिबट्या समोर आल्यास घाबरून धावू नये किंवा खाली वाकू नये. सुरक्षित अंतर राखून शांतपणे परिस्थिती हाताळावी.
बिबट्याचा एकट्याने पाठलाग करू नये. तो घाबरल्यास किंवा बिथरल्यास बचावात्मक हल्ला करण्याची शक्यता असते.
अचानक बिबट्या दिसल्यास त्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्यावे आणि तातडीने वनविभागाला माहिती द्यावी.
बिबट्याला डिवचण्याचा, दगड मारण्याचा किंवा घेरण्याचा प्रयत्न करू नये. फोटो किंवा व्हिडिओ काढण्यासाठी गर्दी करणेही टाळावे.
रात्री शेतात पाणी देण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांनी शक्यतो समूहाने जावे आणि एकमेकांच्या संपर्कात राहावे.
बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात रात्री जाताना टॉर्च किंवा पुरेसा प्रकाश सोबत ठेवावा.
पाळीव जनावरे उघड्यावर न ठेवता सुरक्षित व बंदिस्त गोठ्यात ठेवावीत.
बिबट्या दिसणाऱ्या परिसरात लहान मुलांना विशेषतः संध्याकाळनंतर एकटे घराबाहेर जाऊ देऊ नये.
ज्या भागात बिबट्याचा वावर आढळतो, त्या परिसरात नागरिकांनी शक्यतो समूहाने बाहेर पडावे.
बिबट्याच्या हालचालींची माहिती मिळाल्यास अफवा न पसरवता थेट वनविभागाशी संपर्क साधावा.
“घाबरू नका, मात्र सतर्क राहा” — उमेश गायकवाड
“नागरिकांनी बिबट्याला घाबरून त्याचा पाठलाग करू नये अथवा त्याला डिवचू नये. बिबट्या अचानक दिसल्यास सुरक्षित अंतर ठेवून त्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्यावे. परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे, पाळीव जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत आणि बिबट्याच्या हालचालींबाबत तातडीने वनविभागाला माहिती द्यावी,” असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश गायकवाड, देऊळगाव राजा यांनी केले.
वनविभागाकडून उपाययोजनांची अपेक्षा
परिसरात बिबट्याचा वावर वारंवार जाणवत असल्याने वनविभागाने या बाबीची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून होत आहे. बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी गस्त व निरीक्षण वाढवावे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.