-शरद जोशी यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त तसेच शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रम; विद्यार्थ्यांना दोन्ही नेत्यांच्या विचारांचा आदर्श ठेवण्याचे आवाहन
चिखली (राजेंद्र घुबे): शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा शेतकरी नेते शरद जोशी यांची ९२ वी जयंती तसेच भारताचे दुसरे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून देऊळगाव घुबे येथील जानकी देवी विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. शेणफडरावजी घुबे होते. मुख्य मार्गदर्शक म्हणून शेतकरी नेते तेजराव मुंढे उपस्थित होते. प्रमुख उपस्थितींमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील थुट्टे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास पाटील कणखर, जानकी देवी विद्यालयाचे सचिव प्रा. उद्धवराव घुबे, माजी प्राचार्य हरिदासजी घुबे आणि माजी तंटामुक्ती अध्यक्ष दिनकरराव घुबे यांची उपस्थिती होती.
यावेळी शरद जोशी जयंती व शिक्षक दिनाचे औचित्य साधून भारताचे दुसरे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. तसेच शरद जोशी यांच्या शेतकरी हिताच्या विचारांना उजाळा देण्यात आला. शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा, शेतीमालाला रास्त भाव मिळावा, शेतकरी स्वावलंबी व्हावा आणि शेतीला आर्थिकदृष्ट्या सक्षम स्थान मिळावे, यासाठी जोशी यांनी उभारलेल्या लढ्याचे स्मरण करण्यात आले. या दोन्ही नेत्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी आपल्या यशस्वी वाटचालीसाठी प्रयत्न करावेत, असे मार्गदर्शन अध्यक्षीय भाषणातून शेणफडराव घुबे यांनी केले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक संजय सावंत यांनी केले, तर आभार प्रदर्शन जानकी देवी विद्यालयाचे सचिव प्रा. उद्धवराव घुबे यांनी केले.