-व्हॉट्सअॅपवरील आक्षेपार्ह कमेंट्सची सरपंच-सचिवांची तक्रार; चौकशीसाठी बोलावलेल्या तरुणांकडून पोलिसांवर गंभीर आरोप—निष्पक्ष चौकशीची मागणी
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : उमरद ग्रामपंचायतीतील वाद आता चांगलाच चिघळला असून, या प्रकरणात एकमेकांविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारी व आरोपांमुळे वातावरण चर्चेचा विषय बनले आहे. एका बाजूला ग्रामपंचायतीच्या सरपंच व सचिवांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवरून ग्रामपंचायत, पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांविषयी आक्षेपार्ह व जातीय स्वरूपाच्या कमेंट्स केल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. तर दुसऱ्या बाजूला, या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आलेल्या तरुणांपैकी प्रशांत मुंढे यांनी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मारहाण, विवस्त्र करून फोटो काढणे आणि धमकावल्यासह गंभीर आरोप पोलिस अधीक्षकांकडे केले आहेत.
दरम्यान, पोलिस प्रशासनाने हे आरोप फेटाळत संबंधितांना केवळ चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यांनी व्हॉट्सअॅपवरील कमेंट्स केल्याचे मान्य केल्याने भविष्यात गावातील शांतता भंग होणार नाही, यासाठी बीएनएसएस कलम १६८ अन्वये नोटीस बजावण्यात आली, असे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे उमरद येथील या वादात नेमकी वस्तुस्थिती काय, याबाबत निष्पक्ष चौकशीची मागणी जोर धरत आहे.
सरपंच-सचिवांची व्हॉट्सअॅप ग्रुपविरोधात तक्रार: ग्राम उमरत येथील तक्रार अर्ज
उमरद ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. निर्मला पंढरीनाथ उबाळे आणि ग्रामपंचायत सचिव विनोद शामराव सातपुते यांनी २६ ऑगस्ट रोजी किनगाव राजा पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. सदर अर्ज दाखल करण्यासाठी सरपंचांसह ग्रामपंचायतीचे सदस्य पोलिस ठाण्यात उपस्थित होते. ‘खाऊ ग्रामपंचायत कार्यालय उमरद’ या नावाने असलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये ग्रामपंचायत, सरपंच आणि ग्रामसचिव यांच्याविषयी अपमानास्पद, बदनामीकारक व आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारीमध्ये, ‘पाच वर्षांपासून आमची ग्रामपंचायत गरोदर आहे, ती फक्त आश्वासनाची कळ देते; तिने विकास अजून पैदा केला नाही’, अशा आशयाच्या कमेंटचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच महिला सरपंचांच्या सामाजिक व जातीय ओळखीचा उल्लेख करून अपमानास्पद टिप्पणी करण्यात आल्याचा आरोपही तक्रारदारांनी केला आहे. ग्रामसचिवांविषयीही आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे संबंधितांची सामाजिक प्रतिष्ठा दुखावण्याबरोबरच गावातील सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
‘तरुणांचे भवितव्य खराब होऊ नये’—गुन्हा नोंदवण्याऐवजी समज देण्याची मागणी
पोलिस प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, तक्रारदारांनी संबंधित तरुणांविरुद्ध थेट गुन्हा दाखल करण्याची मागणी केली नव्हती. संबंधित व्यक्ती वयाने कमी असून तरुण आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यास त्यांचे भवितव्य व करिअर प्रभावित होऊ शकते. त्यामुळे त्यांना पोलिस ठाण्यात बोलावून तोंडी समज द्यावी आणि भविष्यात अशा कमेंट्स करू नयेत, अशी भूमिका तक्रारदारांनी घेतल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
सात जणांना चौकशीसाठी बोलावल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण
तक्रारीत नमूद असलेल्या सात व्यक्तींना फोनद्वारे सूचना देऊन चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावण्यात आल्याचे पोलिसांच्या स्पष्टीकरणात नमूद आहे. चौकशीदरम्यान संबंधितांनी आपण कमेंट केल्याचे मान्य केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. यानंतर भविष्यात अशा प्रकारच्या कमेंट्स करून गावातील शांतता भंग करणार नाहीत, यासाठी संबंधितांना बीएनएसएस कलम १६८ अन्वये नोटीस देण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. त्यानंतर गावातील प्रतिष्ठित नागरिक गजानन केकान यांना पोलिस ठाण्यात बोलावून संबंधित तरुणांना त्यांच्या ताब्यात देण्यात आल्याचेही पोलिसांच्या बाजूने सांगण्यात आले आहे.
दरम्यान, पोलिसांवरच गंभीर आरोप
या कारवाईनंतर प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. उमरद येथील प्रशांत मुंढे यांनी पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांच्याकडे निवेदन सादवून किनगाव राजा पोलिस ठाण्याचे ठाणेदार संजय मातोंडकर यांच्यासह संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. निवेदनानुसार, २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे सात वाजता प्रशांत मुंढे, योगेश मुंढे, गणेश बोडखे आणि शुभम घुगे यांना पोलिस कर्मचारी राजू खार्डे यांनी पोलिस ठाण्यात बोलावले. त्यानंतर चौघांना ठाणेदारांच्या कार्यालयात नेण्यात आले. कोणत्या तक्रारीच्या संदर्भात बोलावण्यात आले आहे, याची स्पष्ट माहिती न देता शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. संबंधितांचे मोबाईल फोन ताब्यात घेण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे.
‘विवस्त्र करून मारहाण व फोटो काढले’—निवेदनातील गंभीर दावा
प्रशांत मुंढे यांच्या निवेदनात पोलिस ठाण्यातील कथित वर्तणुकीबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. चौघांना एका स्वतंत्र खोलीत नेऊन कपडे काढण्यास भाग पाडण्यात आले आणि त्यानंतर थप्पड-बुक्क्यांनी तसेच बुटाने मारहाण केल्याचा दावा करण्यात आला आहे. यावेळी आमदाराच्या संपर्कातील व्यक्ती कोण, अशी विचारणा करण्यात आल्याचा आणि उत्तर न दिल्याने मारहाण झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच विवस्त्र अवस्थेतील फोटो काढण्यात आले आणि ते गावातील व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये प्रसारित करण्याची धमकी देण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी गणेश वारकरी यांनी फोटो काढल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
पोलिस प्रशासनाकडून आरोप फेटाळण्याची भूमिका
दुसरीकडे, पोलिस प्रशासनाच्या बाजूने संबंधितांना चौकशीसाठी बोलावून प्रतिबंधात्मक स्वरूपाची कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यांना नोटीस देण्यात आली असून, त्यानंतर प्रतिष्ठित नागरिकांच्या ताब्यात देण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच २८ ऑगस्टनंतर या प्रकरणाबाबत पोलिस ठाण्यात किंवा सोशल मीडियावर कोणतीही तक्रार नसताना प्रशांत मुंढे यांनी पोलिस प्रशासनाची बदनामी करण्याच्या उद्देशाने खोटा अर्ज केल्याचा दावा पोलिसांच्या बाजूने करण्यात आला आहे. मात्र, पोलिस प्रशासनाकडून करण्यात आलेला हा दावा आणि प्रशांत मुंढे यांनी केलेले आरोप यांची स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक आहे.
सीसीटीव्ही आणि डिजिटल पुरावे महत्त्वाचे
या प्रकरणात २८ ऑगस्ट रोजीच्या संबंधित कालावधीतील किनगाव राजा पोलिस ठाण्याचे सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरू शकते. संबंधित व्यक्ती पोलिस ठाण्यात कधी दाखल झाल्या, त्यांना कोणत्या ठिकाणी नेण्यात आले, किती वेळ चौकशी झाली आणि त्या कालावधीत कोण कोण उपस्थित होते, याबाबत सीसीटीव्हीमधून वस्तुस्थिती स्पष्ट होण्यास मदत होऊ शकते. त्याचप्रमाणे व्हॉट्सअॅप ग्रुपमधील मूळ कमेंट्स, स्क्रीनशॉट, मोबाईलमधील डिजिटल पुरावे, पोलिस ठाण्याच्या नोंदी, नोटिसा आणि संबंधितांचे जबाब तपासणेही महत्त्वाचे ठरणार आहे.
आरोप-प्रत्यारोपांच्या पलीकडे सत्य समोर येण्याची गरज
उमरद ग्रामपंचायत वाद आता केवळ ग्रामपंचायत प्रशासनापुरता मर्यादित राहिलेला नसून, त्यातून पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणाला बगल देऊन दोन्ही बाजूंच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह किंवा जातीय स्वरूपाच्या टिप्पणी झाल्या असतील, तर त्याचीही गंभीर दखल घेतली जाणे आवश्यक आहे. त्याचवेळी पोलिस ठाण्यात मारहाण अथवा मानहानीकारक वर्तन झाल्याचा दावा करण्यात आला असल्यास, त्याचीही स्वतंत्रपणे चौकशी होणे गरजेचे आहे. सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल पुरावे आणि संबंधितांचे जबाब यांच्या आधारे संपूर्ण प्रकरणाची वस्तुनिष्ठ चौकशी झाल्यास सत्य परिस्थिती स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही निष्कर्षापूर्वी अधिकृत तपास यंत्रणेच्या निष्पक्ष चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाची नोंद : या वृत्तातील आरोप व दावे हे संबंधित तक्रारदार, निवेदनकर्ते आणि पोलिस प्रशासनाने मांडलेल्या भूमिकेवर आधारित आहेत.