-उपवनसंरक्षक, बुलढाणा यांचा आदेश; जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्या तक्रारीची दखल
मेहकर (सुरेश हुसे) : घाटबोरी वनपरिक्षेत्रातील नागेशवाडी, टेंभुरखेड तसेच इसवी बीट/गायातील परिसरात कथित अवैध वृक्षतोड, सागवान चोरी तसेच संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबाबत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी १२ जून २०२६ रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रारीची अखेर वनविभागाने गंभीर दखल घेतली असून उपवनसंरक्षक, बुलढाणा वनविभाग यांनी चार सदस्यीय चौकशी समिती नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.
तक्रारीमध्ये स्थानिक शेतकरी व नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही ठिकाणी वनक्षेत्रातील मौल्यवान वृक्षांची मोठ्या प्रमाणावर तोड करून सागवान लाकडाची अवैध वाहतूक व चोरी होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच या प्रकाराकडे संबंधित यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे का अथवा त्यांची काही भूमिका आहे का, याचीही निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी डॉ. टाले यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर उपवनसंरक्षक, बुलढाणा यांनी आदेश काढून चार सदस्यीय चौकशी समिती गठित केली आहे. या समितीत वनपरिक्षेत्र अधिकारी (संरक्षण), बुलढाणा श्री. के. डी. पडोळ यांची अध्यक्ष म्हणून, वनपाल श्री. एच. एन. गिते यांची सदस्य सचिव म्हणून, वनरक्षक श्री. एस. एस. माने यांची सदस्य म्हणून, तर पोलीस कॉन्स्टेबल श्री. सतीश काकड यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सदर समितीने तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलेल्या वृक्षतोड व सागवान चोरीच्या अनुषंगाने सखोल चौकशी करून चौकशी अहवाल स्पष्ट अभिप्रायासह विनाविलंब उपवनसंरक्षक कार्यालयास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दोषी आढळल्यास कठोर कारवाईची मागणी
वनसंपत्ती ही शासनाची व जनतेची अमूल्य संपत्ती असून वनक्षेत्रातील अवैध वृक्षतोड व सागवान चोरीला कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालता कामा नये. चौकशीमध्ये अवैध वृक्षतोड, सागवान चोरी किंवा कर्तव्यात कसूर करणारे अधिकारी-कर्मचारी अथवा इतर व्यक्ती दोषी आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार कठोर कायदेशीर व विभागीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी डॉ. टाले यांनी केली आहे. तसेच चौकशी समितीने केवळ कागदोपत्री चौकशी न करता प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी, उपलब्ध वननोंदींची तपासणी, वृक्षतोड झालेल्या ठिकाणांची पडताळणी, संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविणे तसेच स्थानिक शेतकरी व नागरिकांचे जबाब घेऊन वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, अशी अपेक्षाही क्रांतिकारी शेतकरी संघटनेने व्यक्त केली आहे. “वनसंपत्तीची लूट थांबलीच पाहिजे. चौकशी निष्पक्ष झाली आणि दोषी व्यक्ती स्पष्टपणे समोर आल्या, तर त्यांच्यावर कठोर कारवाई होईपर्यंत आम्ही पाठपुरावा करणार,” असा इशारा जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी दिला.