-चांगेफळ ग्रामपंचायतीतील नियोजनबद्ध विकासकामांची दखल; जिल्हा परिषदेच्या वतीने गौरव
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : चांगेफळ आणि साखरखेर्डा येथील ग्रामपंचायत अधिकारी मनोज मोरे यांना जिल्हा परिषदेच्या वतीने ‘संवेदनशील ग्राम’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. चांगेफळ ग्रामपंचायतीमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने विविध विकासकामे राबविल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली.
बुलढाणा जिल्ह्यातील २०० ग्रामपंचायतींची ‘सीईओ संग्राम अभियानासाठी’ निवड करण्यात आली होती. ज्या ग्रामपंचायतींमध्ये विकासकामांना गती देण्याची आवश्यकता होती, अशा ग्रामपंचायतींमध्ये रस्ते, ग्रामपंचायत इमारत, शाळांची दुरुस्ती व देखभाल यांसह विविध विकासकामांना विशेष प्राधान्य देण्यात आले. सिंदखेडराजा तालुक्यातील चांगेफळ ग्रामपंचायतीचाही या अभियानात समावेश होता. ग्रामपंचायत अधिकारी मनोज मोरे यांनी तीन वर्षांच्या कार्यकाळात नियोजनबद्ध पद्धतीने विविध विकासकामे पूर्ण केली. ‘मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत’ अंतर्गत सुनियोजित पद्धतीने कामे केल्याने चांगेफळ ग्रामपंचायतीची ‘संवेदनशील ग्राम’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. १४ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेत आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या हस्ते मनोज मोरे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
मनोज मोरे यांनी यापूर्वी साखरखेर्डा ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून तब्बल १५ वर्षे काम केले आहे. ज्ञानेश्वर चनखोरे यांची पदोन्नती झाल्यानंतर पुन्हा मनोज मोरे यांच्याकडे साखरखेर्डा ग्रामपंचायतीचा कारभार सोपविण्यात आला आहे. चांगेफळ आणि साखरखेर्डा या दोन्ही मोठ्या ग्रामपंचायतींचा कारभार सांभाळताना त्यांनी दाखविलेली कामाची हातोटी वाखाणण्याजोगी असून, त्यांच्या कार्याची यापूर्वीही विविध पुरस्कारांनी दखल घेण्यात आली आहे.