-२६५ नागरिकांची नेत्र तपासणी; ११४ जणांना मोफत चष्मे, २५ मोतीबिंदू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याची घोषणा
चिखली (अंकुश पाटील) : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार तथा माजी मंत्री स्वर्गीय भारतभाऊ बोंद्रे यांच्या जयंती पंधरवड्यानिमित्त चिखली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित विविध सामाजिक उपक्रमांतर्गत मंगरूळ (ई) येथे मोफत नेत्र तपासणी व औषध वाटप शिबिर उत्साहात पार पडले.
शिबिरात एकूण २६५ ग्रामस्थांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी ११४ रुग्णांना चष्म्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले असून, त्यांचे नंबर नोंदवून लवकरच सर्वांना मोफत चष्मे वितरित करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
तसेच सुमारे २५ रुग्णांमध्ये मोतीबिंदूचे निदान झाले. संबंधित रुग्णांची मधुमेह (शुगर) व रक्तदाब (बीपी) तपासणी करून त्यांच्यावर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. शिबिराच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष शंतनू बोंद्रे होते. यावेळी आयोजकांसह कार्याध्यक्ष लक्ष्मण कव्हळे, वसीम शेख, गणेश राजे, शेनफड पाटील
, दामूअण्णा शिंदे, अक्षय सुरुशे आदी उपस्थित होते. शिबिरासाठी नेत्र शल्यचिकित्सक डॉ. भिलावेकर, डॉ. गवते, डॉ. खेडेकर, नेत्र चिकित्सा अधिकारी श्रीमती हिवराळे, श्री. सवडतकर, श्री. गाडेकर, श्री. पोळ, आरोग्य सेविका भोपळे तसेच आरोग्य सेवक नवरे यांनी नागरिकांना तपासणी व उपचार सेवा दिली.