-पेट्रोल पंपांवरील कारवाईवरून संतप्त नागरिकांचा सवाल; लोणार शहरातील कचरा, सार्वजनिक स्वच्छता आणि बसस्थानकावरील सुविधांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप
लोणार (वाजिद खान) : लोणार तालुक्यातील पेट्रोल पंपांवर मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याच्या कारणावरून प्रशासनामार्फत नोटिसा बजावण्यात आल्यानंतर स्थानिक आमदारांवर आता नागरिकांकडूनच टीकेची झोड उठू लागली आहे. खाजगी पेट्रोल पंपांवरील पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतेची चिंता व्यक्त करणाऱ्या आमदारांना जागतिक कीर्तीचे पर्यटन स्थळ असलेल्या लोणार शहरातील कचऱ्याचे साम्राज्य, सार्वजनिक स्वच्छतेची दुरवस्था आणि एसटी बसस्थानकावर प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याचे का दिसत नाही, असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, लोणार बसस्थानकावरून दररोज हजारो प्रवासी, विद्यार्थी आणि महिला प्रवास करतात. मात्र, बसस्थानकावर शुद्ध पिण्याच्या पाण्याची कोणतीही समाधानकारक व्यवस्था नसल्याने प्रवाशांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते किंवा बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागते. अशा परिस्थितीत सरकारी मालमत्तेतील सुविधा सुधारण्याऐवजी खाजगी पेट्रोल पंपांवर कारवाई करण्यावर भर दिला जात असल्याची टीका होत आहे. जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या लोणार सरोवराला देश-विदेशातून पर्यटक भेट देतात. मात्र, शहरात प्रवेश करताच त्यांना कचऱ्याचे ढीग, उघड्या गटारी आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांचीही अवस्था अत्यंत दयनीय असून, त्यामुळे शहराची प्रतिमा मलिन होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
नागरिकांचा आरोप आहे की, स्वतःच्या मतदारसंघातील मूलभूत समस्या सोडविण्यात अपयशी ठरलेल्या लोकप्रतिनिधींनी प्रसिद्धीसाठी खाजगी व्यावसायिकांवर कारवाई करण्याऐवजी बसस्थानकावरील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शहरातील स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. “दुसऱ्यांना नियम सांगण्यापूर्वी स्वतःच्या कार्यक्षेत्रातील प्रश्न सोडवावेत,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. लोणार शहराचा चेहरा स्वच्छ, सुंदर आणि पर्यटकांसाठी सुसज्ज करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अन्यथा आगामी काळात जनतेकडून तीव्र लोकशाही मार्गाने आवाज उठविला जाईल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.