-“घामाचे दाम द्या; शेती परवडत नसेल तर सरकारने उत्तर द्यावे” — देऊळगाव महीतून उठला शेतकऱ्यांच्या संतापाचा आवाज
देऊळगाव मही (सुरेश हुसे) : बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथील शेतकरी नेते मधुकर शिंगणे यांनी देऊळगाव राजा तहसीलदार मुंढे यांच्या मार्फत दि. ८ जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनातून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वाढता उत्पादन खर्च, शेतमालाला मिळणारे कमी दर आणि बाजारभावातील तफावत यामुळे शेतकरी अडचणीत सापडल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
“फसवी कर्जमाफी नको, भाव फरकातील लूट परत द्या,” अशी ठाम भूमिका घेत शिंगणे यांनी शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित न्याय्य दर देण्याची मागणी केली आहे. निवेदनात पाऊस कमी असो, अतिवृष्टी असो, गारपीट असो किंवा बोगस बियाण्यांचा फटका असो, प्रत्येक संकटाचा सर्वाधिक परिणाम शेतकऱ्यांवरच होत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. निवेदनात कोरोना काळाचाही उल्लेख करण्यात आला आहे. संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये असताना शेतकरी शेतात राबत राहिला आणि देशाची अन्नसाखळी अखंड ठेवली; मात्र त्याच शेतकऱ्याला आजही त्याच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळत नसल्याचे शिंगणे यांनी नमूद केले आहे.
सोयाबीनच्या दराचा संदर्भ देताना त्यांनी २००६ मधील आंदोलनांची आठवण करून दिली आहे. त्या काळात सोयाबीनला सहा हजार रुपये प्रतिक्विंटल भावाची मागणी करण्यात आली होती. मात्र जवळपास दोन दशकांनंतरही शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे ते चार हजार रुपयांच्या दरानेच माल विकावा लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे खत, बियाणे, कीटकनाशके, मशागत, मजुरी तसेच पेट्रोल-डिझेलच्या किमती सातत्याने वाढत असल्याने शेतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हंगामाच्या काळात कापूस, मका, तूर आणि सोयाबीनला कमी दर मिळतात; मात्र तोच माल व्यापाऱ्यांच्या गोदामात गेल्यानंतर त्याचे भाव हजारो रुपयांनी वाढतात, असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. शेतमालाच्या दरातील या तफावतीमुळे एका हंगामात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे कर्जमाफीपेक्षा शेतमालाला योग्य भाव देणे आणि शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळवून देणे अधिक महत्त्वाचे असल्याचे शिंगणे यांनी म्हटले आहे. निवेदनात राज्यातील शेतकरी नेते आणि विविध शेतकरी संघटनांनाही सवाल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकत्र येऊन व्यापक आंदोलन उभारण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करत शेतकरी हिताच्या मुद्द्यांवर एकसंघ भूमिका घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या निवेदनावर शेतकरी नेते मधुकर शिंगणे यांच्यासह प्रदीप हिवाळे, शेख जुल्फिकार शेख यासीन, पुरुषोत्तम शिंगणे, विठोबा नागरे, वसंतराव पाटील, संतोष पाटील भुतेकर, युवा सेना उपजिल्हाप्रमुख संचिनभाई कदम (सरपंच, मडपगाव) तसेच इतर शेतकरी प्रतिनिधींनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. देऊळगाव मही येथून व्यक्त झालेला हा आवाज केवळ एका गावापुरता मर्यादित नसून राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या आर्थिक चिंतेचे आणि अपेक्षांचे प्रतिनिधित्व करणारा असल्याची चर्चा कृषी वर्तुळात सुरू आहे. शेतमालाला हमीभाव, उत्पादन खर्चावर आधारित दरनिर्धारण आणि बाजारातील पारदर्शकता या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने पाहावे, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.