-नाविन्यपूर्ण शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे कौतुक; आधुनिक व शाश्वत शेतीसाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही
वर्धा (प्रकाश कथले) : कृषी विभागाच्या वतीने सन २०२३ आणि २०२४ या वर्षांतील राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांसाठी निवड झालेल्या वर्धा जिल्ह्यातील पुरस्कारप्राप्त शेतकरी आणि कृषी अधिकाऱ्यांचा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते मुंबई येथील मंत्रालयातील कार्यालयात सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी राज्यस्तरावर मिळविलेला हा सन्मान अभिमानास्पद असल्याचे सांगत पालकमंत्र्यांनी सर्व पुरस्कारप्राप्तांचे अभिनंदन करून त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी आमदार राजेश बकाने उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. भोयर म्हणाले की, नाविन्यपूर्ण शेती, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, संशोधनाची जोड आणि अथक परिश्रम यांच्या बळावर या शेतकऱ्यांनी राज्यस्तरावर जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे. त्यांच्या अनुभवातून आणि कार्यातून राज्यातील इतर शेतकऱ्यांनाही नवी प्रेरणा मिळेल. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी शासन सदैव कटिबद्ध असून आधुनिक, शाश्वत आणि समृद्ध शेतीसाठी प्रयोगशील शेतकऱ्यांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी कृषी दिनानिमित्त मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले होते. सन २०२३ च्या पुरस्कारांमध्ये पवनी येथील युवा प्रयोगशील महिला शेतकरी प्रतिभा प्रमोद महाजन यांना नाविन्यपूर्ण प्रयोग आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरासाठी ‘युवा शेतकरी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच उपकृषी अधिकारी मनोज झिबलराव गायधने यांना शेतकऱ्यांपर्यंत शासकीय योजना प्रभावीपणे पोहोचविल्याबद्दल शासकीय श्रेणीतील ‘पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
सन २०२४ च्या पुरस्कारांमध्ये सेलू तालुक्यातील आमगाव मदनी येथील शेतकरी नंदकिशोर किसनराव गावंडे यांना ‘कृषिभूषण पुरस्कार’, पवनार येथील युवा शेतकरी प्रांजल विठ्ठलराव वाघमारे यांना ‘युवा शेतकरी पुरस्कार’ आणि आमगाव मदनी येथीलच शेतकरी अभय निळकंठराव ढोकणे यांना शेतीतील निष्ठा, सातत्य आणि प्रयोगशीलतेबद्दल ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. मंत्रालयात आयोजित या सत्कार समारंभात पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सर्व पुरस्कारप्राप्तांचा गौरव करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले तसेच भविष्यातही शेती क्षेत्रात नवनवीन प्रयोग करून इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी कार्य करत राहण्याचे आवाहन केले.