-उत्साहपूर्ण वातावरणात निवड प्रक्रिया पार; समर्थकांकडून जल्लोष, विकासाला गती मिळण्याची अपेक्षा
अंकुश पाटील (चिखली) : बुलढाणा जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील महत्त्वाच्या चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची निवड गुरुवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या निवड प्रक्रियेत समाधान सुपेकर यांची सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिदोरीगृहात झालेल्या निवड प्रक्रियेदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र घोंगे यांनी कामकाज पाहिले. यावेळी दोन संचालक वगळता सर्व संचालक उपस्थित होते. पक्षश्रेष्ठींनी सभापतीपदासाठी समाधान सुपेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. त्यांच्या उमेदवारीचे तीन अर्ज दाखल करण्यात आले होते. अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर अन्य कोणत्याही उमेदवाराचा अर्ज शिल्लक न राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र घोंगे यांनी समाधान सुपेकर यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली.
घोषणा होताच बाजार समिती परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. समर्थक आणि कार्यकर्त्यांनी समाधान सुपेकर यांचा शाल, पुष्पहार देऊन सत्कार केला तसेच फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी समाधान सुपेकर यांची निवड झाल्याने शेतकरी, व्यापारी तसेच बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील विविध घटकांनी समाधान व्यक्त केले आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीच्या विकासाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सभापती निवडीवेळी श्रीकिसन तेजराव धोंडगे, गणेश पुंजाजी थुट्टे, परमेश्वर सखाराम पवार, श्रीकृष्ण सुभाष मिसाळ, पांडुरंग बाजीराव भुतेकर, संतोष शिवाजी वाकडे, समाधान गोविंदा सुपेकर, कमल विष्णु कुळसुंदर, मंदाबाई शेनफड भुतेकर, रामेश्वर श्रीपत जाधव, संतोष रमेश वानखेडे, रामेश्वर शिवशंकर खेडेकर, मनोज सारंगधर लाहुडकर, समाधान सुखदेव परिहार, संजय सुखदेव गवई आणि राजेश गजानन पवार उपस्थित होते.