खामगाव(ब्रेकिंग महाराष्ट्र):- येथे बैलपोळा सणाच्या वेळी झालेल्या घटनेत पोलीस प्रशासनाने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ सोमवार 29 ऑगस्ट रोजी खामगाव शहरातील गणेश मंडळे विविध सामाजिक संघटना व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने खामगाव बंदची हाक देण्यात आली आहे.अशी माहिती खामगाव विधान सभा मतदार संघाचे आमदार ॲड. आकाश फुंडकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.
खामगाव शहरात बैलपोळ्याच्या सणानिमित्त फरशी येथे बैलपोळा आयोजित करण्यात आला होता.. परंतु या बैलपोळ्याच्या ठिकाणी इकड-दुक्कड होमगार्ड पोलीस बंदोबस्तात लावण्यात आले होते. इथे हजारोची संख्या जमलेली असताना पोलीस प्रशासनातले जबाबदार अधिकारी हे सदर ठिकाणी उपस्थित नव्हते. त्यामुळे या ठिकाणी उपस्थित असलेल्या काहींनी हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणीं पोलिस बंदोबस्त असता, जबाबदार अधिकारी हजर असते तर ही घटना घडलीच नसती. परंतु या घटनेला हिंदू – मुस्लिम चे स्वरूप देऊन हे एसीत बसून प्रशासन चालवणारे पोलीस अधिकारी येणाऱ्या काळात गणेशोत्सवासह विविध सणांवर अंकुश बसू इच्छित आहेत. राज्याचे मुख्यमंत्री हे सण उत्साहात व हर्षोल्हासात साजरे करा,असे आवाहन करत असताना खामगाव शहरातील पोलीस प्रशासकीय अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, डीवायएसपी अमोल कोळी व शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अरुण परदेशी हे तीन अधिकारी एसीत बसून खामगाव शहरातील सर्वसामान्य मुलांना आरोपीच्या पिंजऱ्यात टाकत आहेत. पोळ्याच्या दिवशी झालेल्या घटनेबाबत 76 मुलांना आरोपी करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि जवळपास 300 च्या वर मुलांना पोलीस शोधत आहे ही खरंतर गंभीर बाब असून याबद्दल आम्ही नक्कीच दाद मागणार आहोत. परंतु येणाऱ्या काळात पोलीस प्रशासकीय अधिकारी हे अशा प्रकारे घटनेला हिंदू मुस्लिम चे वळण देऊन खामगाव शहराची सामाजिक शांतता भंग करून विविध गणेश मंडळांना दडपणात आणून गणेश मंडळा च्या गणेशोत्सवावर मर्यादा लावून हा हर्षोल्हासाचा सण पोलिसी दडपशाही करून विविध बंधने लावून साजरा करण्याच्या प्रयत्न करीत आहे. खामगाव शहरात मागील 10 ते 12 वर्षांपासून हिंदू -मुस्लिमचे कोणतेही वाद नाहीत परंतु हे तीन अधिकारी अशा प्रकारचे स्वरूप देऊन खामगाव शहराची शांतता भंग करीत आहेत त्यामुळे या तीनही पोलीस अधिकाऱ्यांची या सणाच्या काळात खामगाव शहराच्या बाहेर अन्यत्र बंदोबस्त लावण्यात यावा व खामगाव या मोठ्या गणेशोत्सव व इतर धार्मिक सण हर्षोल्हासात साजरा करणाऱ्या शांतताप्रिय गावात शांतता नांदण्यासाठी जबाबदार व अनुभवी पोलीस प्रशासकीय अधिकारी यांची तात्काळ नियुक्ती करण्यात यावी व पोलीस प्रशासनाने बैलपोळाच्या काळात झालेल्या घटनेबाबत जबरदस्ती व दबाव आणण्यासाठी केलेली कारवाई तात्काळ मागे घेण्यात यावी अशी मागणी आमदार ॲड. आकाश फुंडकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत यावेळी केली. या घटनेच्या निषेधार्थ खामगाव शहरातील गणेश मंडळ व हिंदुत्ववादी संघटनेने सोमवार 29 ऑगस्ट 2022 रोजी खामगाव बंदची हाक दिलेली आहे तरी खामगाव शहरातील तमाम नागरिकांनी या बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन पोलीस प्रशासनाच्या दडपशाहीला विरोध करून आपली प्रतिष्ठाने बंद ठेवावी आपले सर्व व्यवहार बंद ठेवावे असे आवाहन खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. आकाश फुंडकर यांनी विविध गणेश मंडळ व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने केले आहे.
विशेष म्हणजे पोलीस प्रशासनाच्या वतीने पत्रकारांची सुद्धा मुस्कटदाबी होत असून माहिती घेण्यास गेलेल्या पत्रकारांना माहिती मिळत नाही. तर माहिती घेण्यास गेलेल्या पत्रकारांना पोलीस स्टेशन बाहेर काढल्या जाते. त्यामुळे एखादी कारवाई दडपण्याचा प्रयत्न तर होत नाही अशी शंका व्यक्त करण्यात येते. पत्रकारांना बाहेर काढल्या जात असल्याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक चावरीया यांना सुध्दा माहिती देण्यात आली आहे. तरी पत्रकारांची मुस्कटदाबी होणार नाही याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.