– काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत निवडणूक कार्यक्रम जाहीर
नवी दिल्ली (विशेष राजकीय प्रतिनिधी) – अखेर अखिल भारतीय काँग्रेसला नवीन अध्यक्ष मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेस कार्यसमितीच्या (सीडब्लूसी) बैठकीत अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबरला निवडणूक घेण्याचे ठरले असून, १९ ऑक्टोबरला मतमोजणी व नव्या अध्यक्षांची घोषणा करण्याचे ठरले आहे. २२ सप्टेंबररोजी निवडणूक अधिसूचना जारी होईल, २४ ते ३० सप्टेंबरपर्यंत इच्छुक नेते आपले नामांकन अर्ज भरू शकतील. अध्यक्षपदासाठी एकच उमेदवारी अर्ज आला तर ३० सप्टेंबररोजीच नवीन अध्यक्ष काँग्रेसला मिळतील.
रविवारी काँग्रेस कार्य समितीची बैठक पार पडली. या बैठकीतील निर्णयांची माहिती केंद्रीय निवडणूक प्राधीकरणाचे अध्यक्ष मधुसुदन मिस्त्री यांनी दिली. माजी केंद्रीय मंत्री तथा पक्षाचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी सांगितले, की पक्षाच्या अध्यक्षपदासाठी कुणीही अर्ज दाखल करू शकेल. अशा प्रकारची लोकशाही फक्त आमच्याच काँग्रेस पक्षात आहे. आज झालेल्या बैठकीला काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांध या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर राहिल्या, तर माजी पंतप्रधान डॉ. मनमोन सिंग, केसी वेणुगोपाल, माजी मंत्री जयराम रमेश, मुकूल वासनीक, पी. चिदंबरम, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह वरिष्ठ नेते या बैठकीला हजर होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला सोनिया गांधी व्हिडोओ कॉन्फरन्सिंगद्वारा उपस्थित होत्या. तब्येतीच्या कारणास्तव सोनिया गांधी सध्या परदेशात असून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे दोघंही सोनिया गांधी यांच्याबरोबर परदेशात आहेत.
काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे नाव आघाडीवर आहे. तथापि, अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांनी पुनर्विचार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आपण, राहुल यांना या जबाबदारीसाठी तयार करू, असेही ते म्हणाले.
- काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं वेळापत्रक
22 सप्टेंबर – अधिसूचना
24 सप्टेंबर – नामांकन अर्ज दाखल करण्याची तारीख
30 सप्टेंबर – नामांकन अर्ज मागे घेण्याची तारीख
17 ऑक्टोबर – मतदान
19 ऑक्टोबर – मजमोजणी