आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : राज्यात गेली दोन वर्षे कोरोनाच्या महामारीचे संकट होते. गेल्या दोन वर्षातील सण, उत्सव कोरोनाचे सावटात अत्यंत साध्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. यावर्षी मात्र गणेशोत्सव बंधन व निर्धेश मुक्त असून प्रथापरंपरांचे पालन करीत उत्साहात साजरा होत आहे. यासाठी मात्र गणेशाचे आगमन धुमधडाक्यात करण्याचा चंग सर्वत्र बांधला असल्याचे दिसून येत आहे. सुरुवात म्हणून ध्यास फौंडेशन संचलित महर्षी वाल्मिकी विद्यावर्धिनी व महर्षी वाल्मिकी बालक मंदिर विभागांत पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासून गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा दोन दिवस उत्साहात झाली.
दोन दिवसांत आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत ह. भ. प. हरिनारायण ढगेकर गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना शाडूच्या मातीची वैशिष्ट्य, गणेशमूर्ती बनवण्याची सोपी पद्धत तसेच मूर्तीच्या चेहऱ्यावर जिवंत हावभाव कसे साकारावेत याबाबत माहिती सांगितली. त्या प्रमाणे विद्यार्थ्यां कडून विविध आकारांत गणेशमूर्ती बनवून घेतल्या. या कार्यशाळेत इयत्ता पाचवीच्या वर्गांतील विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला होता. प्रशालेच्या मुख्याध्यापिका अक्षता कुलकर्णी यांचेसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रशिक्षक व विद्यार्थ्यांचे गणेश मूर्ती पाहून कौतुक केले.