-भगवानगडासाठी प्रतापराव ढाकणे यांच्याकडून ५१ लाखांची देणगी जाहीर
बोधेगाव (बाळासाहेब खेडकर) : अकोले येथे अधिक मासानिमित्त संत भगवान बाबा यांनी प्रारंभ केलेल्या २२ व्या भव्य अखंड हरीनाम सप्ताहाची शुक्रवारी भक्तिमय वातावरणात उत्साहपूर्ण सांगता झाली. सप्ताहाच्या अंतिम दिवशी ह.भ.प. डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांच्या भावस्पर्शी आणि भक्तिरसपूर्ण कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. सप्ताहभर हरिनाम, प्रवचन, भागवत कथा, भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला होता.
या सप्ताहात ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांच्या अमृतमय वाणीतून श्रीमद्भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या कथेमधून भक्ती, संस्कार, समाजप्रबोधन आणि अध्यात्म यांचे महत्त्व भाविकांना पटवून देण्यात आले. तसेच ह.भ.प. कृष्णा महाराज भगवानगड, विलास महाराज गजगे, सोपान महाराज शास्त्री, ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, निवृत्ती महाराज इंदुरीकर, तुकाराम महाराज मुंडे आणि जगन्नाथ महाराज यांच्या हरिकीर्तनांनी वातावरण अधिकच भक्तिमय झाले. हजारो भाविकांनी या कीर्तनांचा लाभ घेत हरिनामाच्या गजरात सहभाग नोंदविला.
भगवानगडाच्या विकासाबाबत महत्त्वपूर्ण घोषणा
सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात भगवानगडावर उभारण्यात येत असलेल्या भव्य-दिव्य ज्ञानेश्वर मंदिराचे काम लवकरच पूर्ण होणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. यावेळी बोलताना डॉ. नामदेव शास्त्री म्हणाले की, “मुलावर विश्वास ठेवा, जगन्नाथ महाराज अत्यंत उत्तम नियोजन करत आहेत. नवीन महाराजही चांगले कार्य करत असून दसऱ्यानंतर कृष्णा महाराज भगवानगडाचा कारभार सांभाळणार आहेत. खर्डा ते बुलढाणा परिसरापर्यंत भगवानगडाचे कार्य अधिक व्यापक आणि प्रभावी स्वरूपात उभे राहणार आहे.” इतिहासातील आठवणींना उजाळा देताना त्यांनी सांगितले की, माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी सर्व समाजाच्या सहभागातून भगवानगडावर पांडुरंगाची मूर्ती स्थापना केली होती. तसेच दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी महंत भीमसिंह महाराज यांच्याशी चर्चा करून मला प्रथम संधी दिल्याची आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. भगवानगड येथे साजरा झालेला शताब्दी महोत्सव हा राज्यभरातील भक्तांसाठी ऐतिहासिक पर्व ठरल्याचेही त्यांनी नमूद केले.
धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांना प्राधान्य
यावेळी बुलढाणा व खर्डा येथील गीते बाबा संस्थानाच्या कार्याचाही गौरव करण्यात आला. भविष्यात भगवानगडाच्या माध्यमातून गावोगावी ज्ञानेश्वर पारायण, ज्ञानदान, अन्नदान आणि विविध धार्मिक-सामाजिक उपक्रम प्राधान्याने राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. लाखो रुपयांची विकासकामे आणि समाजोपयोगी उपक्रम राबवून भगवानगडाचे कार्य अधिक व्यापक करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. सप्ताहाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल जगन्नाथ महाराज यांचे विशेष कौतुक करण्यात आले. पंढरपूर ते थेट लंडनपर्यंत विठ्ठल भक्तीचा संदेश पोहोचविणारे चिंचपूर इजदे येथील अशोक खेडकर यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. त्यांच्या माध्यमातून विठ्ठलाच्या पादुकांचे दर्शन जागतिक स्तरावर घडत असल्याचे सांगण्यात आले. लवकरच लंडनमध्ये विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती स्थापना होणार असून संत भगवान बाबांच्या पुण्यतिथी उत्सवाची विदेशातही नव्याने सुरुवात करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
५१ लाखांच्या देणगीची घोषणा
कार्यक्रमातील सर्वात महत्त्वपूर्ण क्षण म्हणजे केदारेश्वरचे माजी अध्यक्ष प्रतापराव ढाकणे यांनी भगवानगडासाठी जाहीर केलेली ५१ लाख रुपयांची देणगी होय. स्व. बबनराव ढाकणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही देणगी देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. “ढाकणे परिवार आणि भगवानगड हे एक वेगळेच नाते आहे,” असे भावनिक उद्गार त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या या घोषणेनंतर उपस्थित भाविकांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. कार्यक्रमास कृष्णा महाराज भगवानगडकर, जगन्नाथ महाराज यांच्यासह पंचक्रोशीतील हजारो भाविक, महिला वर्ग, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कीर्तनानंतर चौथे मठाधिपती कृष्णा महाराज भगवानगड यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. “भगवान बाबा की जय”च्या जयघोषात आणि हरिनामाच्या अखंड गजरात या भव्य अखंड हरीनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात उत्साहपूर्ण सांगता झाली.