-पेपरफुटीच्या घटनांमुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये चिंता; शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
देऊळगाव घुबे ता. चिखली (राजेंद्र घुबे) : गेल्या दहा-बारा वर्षांपासून निट, सीईटी, एमपीएससी, यूपीएससी, टीईटी, टेटसह विविध स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीच्या घटना सातत्याने समोर येत असून, विशेषतः २०२२ पासून निट परीक्षेतील गैरप्रकार वारंवार उघड होत आहेत. दोन वर्षांपूर्वीही निट पेपरफुटी प्रकरणात कोटा आणि लातूर कनेक्शन समोर आले होते. मात्र त्या प्रकरणाचा पुढे काय निकाल लागला, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती सार्वजनिक झाली नाही. त्यामुळे अशा प्रकरणांतील आरोपींना केवळ औपचारिक अटक करून पुढे पुराव्याअभावी मुक्त केले जाते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
यंदाही निट पेपरफुटी प्रकरणात राजस्थानमधील कोटा, तसेच पुणे, नाशिक, लातूर आणि नांदेड येथील काही दलाल व एका प्राध्यापक महिलेची नावे समोर आली असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र अटक, चौकशी आणि नंतर जामिनावर सुटका हा घटनाक्रम आता सर्वसामान्य बाब बनल्याची भावना व्यक्त होत आहे. चौकशीची दिशा, पुराव्यांची जोडणी आणि संबंधितांवर कोणत्या कलमांखाली कारवाई होते, याकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याने अनेक प्रकरणे थंड्या बस्त्यात जात असल्याची टीका होत आहे. दरम्यान, कोटा, लातूर आणि नांदेडसारख्या शहरांमधील कोचिंग क्लासेसच्या वाढत्या व्यावसायिकीकरणामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याची चर्चा आहे. डॉक्टर, आयआयटी इंजिनिअर किंवा उच्चपदस्थ अधिकारी बनवण्याच्या आशेने पालक लाखो रुपये खर्च करून आपल्या मुलांना अशा कोचिंग संस्थांमध्ये प्रवेश देतात. एका वर्षासाठी पाच ते दहा लाखांपर्यंत शुल्क आकारले जात असल्याने अनेक पालक आर्थिकदृष्ट्या कोलमडून जात आहेत. लेखात असा आरोप करण्यात आला आहे की, अधिकाधिक विद्यार्थी आकर्षित करण्यासाठी काही कोचिंग क्लासेसकडून पेपरफुटीसारख्या प्रकारांना खतपाणी घातले जाते. यामध्ये दलालांचे जाळे सक्रिय असून, पेपरफुटीचे प्रकार योजनाबद्ध पद्धतीने घडवले जात असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. अशा घटनांचा भांडाफोड माध्यमांमधून झाल्यानंतरच प्रशासन सक्रिय होते, तोपर्यंत विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झालेलं असतं.
या सर्व प्रकारांमुळे विद्यार्थ्यांवर मानसिक ताण वाढत असून, काही प्रकरणांमध्ये आत्महत्येसारख्या टोकाच्या घटना घडत असल्याची चिंताही व्यक्त करण्यात आली आहे. शासनाने कोचिंग क्लासेसवर कठोर नियंत्रण ठेवून शाळांचा दर्जा उंचावण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. तसेच पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी मूळ शाळा आणि शिक्षकांवर विश्वास ठेवून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. “पेपरफुटीसारख्या भ्रष्ट प्रकारांना आळा घालण्यासाठी शासन, पालक आणि समाज यांनी एकत्रितपणे पुढाकार घेणे गरजेचे आहे. अन्यथा ‘ये रे माझ्या मागल्या’प्रमाणे हे प्रकार पुन्हा पुन्हा घडत राहतील,” असे मत लेखाच्या शेवटी व्यक्त करण्यात आले आहे.