-नाझेर काझी समर्थकांचा संताप; पालकमंत्र्यांसमोरच घोषणाबाजी करत पदे त्यागली!
बुलढाणा (बाळू वानखेडे) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) उमेदवारीवरून बुलढाणा जिल्ह्यात मोठे बंड उफाळून आले आहे. पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष तसेच बुलढाणा जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांना विधान परिषदेची उमेदवारी नाकारण्यात आल्याने जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ तब्बल ९० प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे देत पक्षाला मोठा धक्का दिला आहे. विशेष म्हणजे हे राजीनामे थेट पालकमंत्री मकरंद पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्याने पक्षांतर्गत खळबळ उडाली आहे.
अॅड. नाझेर काझी हे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचे एकनिष्ठ आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जातात. आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी ते प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र पक्षाने त्यांना डावलून मुंबईतील झिशान सिद्दीकी यांना संधी दिल्याची चर्चा सुरू होताच बुलढाणा आणि अकोला पट्ट्यातील काझी समर्थकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली. ही नाराजी इतकी वाढली की बुलढाण्यात आयोजित पक्षाची महत्त्वाची बैठकही गोंधळामुळे रद्द करावी लागली. जिल्हा दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला. “निष्ठावंतांना डावलून बाहेरच्या उमेदवारांना संधी का?” असा सवाल करत कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष, विविध सेलचे जिल्हाध्यक्ष आणि कार्यकारिणीतील सुमारे ९० जणांनी आपले राजीनामे पत्राद्वारे सुपूर्द केले.
नाझेर काझी यांनी पक्ष बांधणीत मोठे योगदान दिले असूनही त्यांना संधी न मिळाल्याने कार्यकर्ते दुखावले आहेत. झिशान सिद्दीकी यांना प्राधान्य दिल्याने स्थानिक नेत्यांमध्ये ‘बाहेरचा उमेदवार’ अशी भावना निर्माण झाली आहे. काझी हे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष असल्याने या निर्णयाचा परिणाम संपूर्ण विदर्भातील मतदारांवर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. “आम्ही अनेक वर्षांपासून पक्षाचे काम प्रामाणिकपणे करत आहोत. नाझेर काझी यांच्यावर झालेला अन्याय हा कार्यकर्त्यांच्या कष्टाचा अपमान आहे. म्हणूनच आम्ही सामूहिक राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे,” असे नाराज पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर; पक्षासमोर मोठे आव्हान
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर असताना ९० पदाधिकाऱ्यांनी एकदम राजीनामे दिल्याने अजित पवार गटासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी यामुळे विस्कळीत झाली असून हा असंतोष शमवण्यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांतही या नाराजीचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त होत असून आगामी काळात जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.