– अंगणवाडी सेविका कांताबाई काळे यांचा ३७ वर्षांच्या सेवेनंतर निरोप; महाराष्ट्र दिनी दुहेरी सोहळा
चिखली (तालुका प्रतिनिधी) : तालुक्यातील सोनेवाडी येथे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून गावच्या शैक्षणिक प्रगतीला दिशा देणारा दुहेरी सोहळा संपन्न झाला. गावातील युवा पिढीसाठी नव्याने उभारण्यात आलेल्या सुसज्ज अभ्यासिका व सार्वजनिक वाचनालयाचे लोकार्पण करण्यात आले. याच कार्यक्रमात, तब्बल ३७ वर्षे अंगणवाडी सेविका म्हणून सेवा देणाऱ्या कांताबाई काळे यांचा भावपूर्ण सेवापूर्ती सोहळाही पार पडला.
सोनेवाडी येथील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व शालेय अभ्यासासाठी शांत व प्रेरणादायी वातावरण मिळावे, या उद्देशाने या अभ्यासिकेची निर्मिती करण्यात आली आहे. सातगाव भुसारी येथील सुनील दस्तुरे यांच्या हस्ते विधिवत पूजन व फित कापून या केंद्राचे उद्घाटन झाले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता उच्च शिक्षणाची कास धरावी, यासाठी अशा सुविधा मैलाचा दगड ठरतील, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. या प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सचिव, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभ्यासिकेसोबतच सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या वाचनालयामुळे गावात वाचन संस्कृती रुजण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्थानिक प्रतिनिधींनी केले. हा सोहळा सोनेवाडीच्या सामाजिक आणि शैक्षणिक वाटचालीत नवा अध्याय जोडणारा ठरला.
कर्तव्याला ‘सलाम’ : कांताबाई काळे निवृत्त
याच कार्यक्रमाचे दुसरे महत्त्वाचे आकर्षण म्हणजे अंगणवाडी सेविका कांताबाई काळे यांचा सत्कार. ३७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी गावातील पिढ्यानपिढ्यांचे संगोपन केले. बालकांचे आरोग्य, शिक्षण आणि महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल गावकऱ्यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. आपल्या आठवणींना उजाळा देताना कांताबाई भावूक झाल्या होत्या. “हे गाव म्हणजे माझे कुटुंब असून, इथल्या मुलांच्या प्रगतीतच माझे समाधान आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.