-विमा कंपन्यांवर आरोप; १ मे ‘काळा दिवस’ ठरण्याची शक्यता
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : बुलढाणा, दि. १३ एप्रिल रोजी शेतकरी योद्धा कृती समिती, बुलढाणा जिल्हा यांच्या वतीने शेतकऱ्यांसोबत खरीप २०२५ पिक विमा संदर्भात सविस्तर बैठक घेण्यात आली. बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तीव्र संताप व्यक्त करत अंतिम लढ्याचा इशारा देण्यात आला.
खरीप हंगामात बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे शंभर टक्के नुकसान झाले होते. हे नुकसान राज्य सरकारने मान्य करून थेट मदतही दिली होती. मात्र सुरुवातीला प्रशासन नुकसान मान्य करण्यास तयार नव्हते. त्या काळात शेतकरी योद्धा कृती समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी संघर्ष करत स्वतःच्या शेतातील हानीचे पुरावे सादर केले. संस्थापक अध्यक्ष बालाजी सोसे यांनी प्रत्यक्ष परिस्थिती सरकारसमोर मांडली. या संघर्षामुळे प्रशासनाला वास्तव मान्य करावे लागले आणि सिंदखेडराजा, देऊळगाव राजा व लोणार तालुक्यांमध्ये पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी प्रशासन यंत्रणा सक्रिय झाली. मात्र आता प्रश्न अधिक गंभीर झाला असून, सरकारने मान्य केलेल्या नुकसानीसाठी पिक विमा देण्यास विमा कंपन्या नकार देत असल्याचा आरोप करण्यात आला. “सरकार कंपनीच्या भरोशावर चालते का, की कंपन्या सरकारच्या? आणि या दोघांच्या खेळात शेतकरीच का भरडला जातो?” असा सवाल उपस्थित करण्यात आला. सतत पाठपुरावा करूनही काहीच निष्पन्न होत नसल्याने शेतकऱ्यांचा संयम संपत चालल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
ठरल्याप्रमाणे १७ एप्रिल रोजी संबंधित तहसील व उपविभागीय कार्यालयामार्फत मुख्यमंत्री व कृषी मंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे. तसेच २९ एप्रिल २०२६ पर्यंत खरीप तसेच प्रलंबित पिक विमा मंजूर न झाल्यास सिंदखेडराजा तहसील कार्यालयासमोर संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. “ही लढाई आता अंतिम आहे. आम्हाला आंदोलनाची हौस नाही, पण जगण्यासाठी लढावे लागत आहे. १ मे हा दिवस आमच्या शेतकऱ्यांसाठी ‘काळा दिवस’ ठरू नये,” असे भावनिक आवाहन बालाजी सोसे यांनी केले. शासनाने तात्काळ निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही देण्यात आला.