– चिखली मतदारसंघात शिंदेसेना-भाजप आमने-सामने; ‘फॉर्च्युनर’वरून रंगला राजकीय कलगीतुरा!
बुलढाणा (बाळू वानखेडे) : राज्यात महायुतीचे सरकार असले तरी स्थानिक पातळीवर मात्र सत्तेतील मित्रपक्षांमध्ये ‘तू तू-मै मै’ सुरू असल्याचे चित्र चिखली मतदारसंघात पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड आणि भाजप आमदार श्वेता महाले यांच्यातील सुप्त संघर्ष आता उघड झाला असून, आ. गायकवाडांनी ‘३५ कोटींच्या कमिशन’ची दिलेली जाहीर कबुली जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा आणि टीकेचा विषय ठरली आहे.
बुलढाणा येथे आयोजित शिवसेना प्रवेश सोहळ्यात बोलताना आमदार संजय गायकवाड यांची तोफ स्वपक्षाऐवजी मित्रपक्षावरच अधिक धडाडली. “चिखलीतील कार्यकर्त्यांवर अन्याय होत असून, त्यांना त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे,” असा थेट इशारा त्यांनी भाजपला दिला. मात्र, खळबळ उडाली ती त्यांच्या एका विधानामुळे. “मी माझे ३५ कोटींचे कमिशन कार्यकर्त्यांसाठी सोडून दिले, म्हणूनच आज माझा कार्यकर्ता फॉर्च्युनरमधून फिरतोय,” अशी जाहीर कबुली गायकवाडांनी दिली. भ्रष्टाचाराच्या या उघड समर्थनामुळे महायुतीची प्रतिमा मलीन होण्याची शक्यता निर्माण झाली असून, विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे.
आ. गायकवाडांच्या या विधानावर भाजप आमदार श्वेता महाले यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. “ही लोकशाही आहे की दादागिरी?” असा सवाल करत त्यांनी गायकवाडांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. चिखलीतील सरपंचांना जाणीवपूर्वक ‘आरटीआय’ (माहिती अधिकार) अर्जांचा धाक दाखवून त्रास दिला जातो आणि त्यानंतर ‘संजूभाऊंचा निरोप’ सांगून सक्तीने शिवसेनेत प्रवेश घडवून आणला जातो, असा खळबळजनक आरोप महाले यांनी केला आहे. गायकवाडांची भाषा सुसंस्कृत नसल्याची चपराकही त्यांनी लगावली.
चिखली मतदारसंघावर वर्चस्व मिळवण्यासाठी आमदार संजय गायकवाड यांनी चांगलीच ताकद पणाला लावली असून, महायुतीमधील हा ‘ठिणगी’चा खेळ आगामी काळात कोणते वळण घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.