-एमआयटी एडीटी विद्यापीठात ‘सेमिकंडक्टर तंत्रज्ञानावर’ राष्ट्रीय परिसंवाद उत्साहात;
-सेंटर ऑफ एक्सलन्स व ‘सेमी सी’ क्लबचे उद्घाटन
आळंदी (अर्जुन मेदनकर) – सध्या भारत ९४ टक्के सेमिकंडक्टर चिप्स परदेशातून आयात करतो. त्यामुळे देश अद्याप सेमिकंडक्टर तंत्रज्ञानासाठी परावलंबी आहे. सेमिकंडक्टरमध्ये मक्तेदारी असलेल्या देशांनी पुरवठा बंद केल्यास भारताची मोठी कोंडी होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सेमिकंडक्टर मिशनची घोषणा करत ७६ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. भविष्यात या क्षेत्रातील गुंतवणूक १ लाख ६० हजार कोटींपर्यंत वाढून विद्यार्थ्यांसाठी मोठ्या रोजगार संधी उपलब्ध होतील, असे प्रतिपादन एमआयटी एडीटी विद्यापीठ चे कार्याध्यक्ष तथा प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी केले.
ते विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड सायन्सेसतर्फे आयोजित “सेमिकंडक्टर तंत्रज्ञान” या विषयावरील राष्ट्रीय परिसंवाद तसेच सेमिकंडक्टर तंत्रज्ञानातील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ आणि विद्यार्थ्यांच्या ‘सेमिकंडक्टर क्लब (सेमी सी)’ उद्घाटनप्रसंगी बोलत होते. स्व. उर्मिला कराड सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमास भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड चे कार्यकारी संचालक सूर्यनारायण मूर्ती, नेट्रा अॅक्सिलरेटर फाउंडेशनचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक पवार, व्हीएसएलआय सोसायटी, बंगळुरूचे अध्यक्ष डॉ. सत्या गुप्ता, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, अधिष्ठाता डॉ. सुदर्शन सानप, डॉ. विरेंद्र शेटे, कार्यक्रम समन्वयक डॉ. रमेश माळी यांच्यासह उद्योगक्षेत्रातील मान्यवर, तज्ज्ञ, संशोधक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी सूर्यनारायण मूर्ती म्हणाले की, भारतात सेमिकंडक्टर उत्पादनासाठी आवश्यक अत्याधुनिक उपकरणे, प्रक्रियात्मक क्षमता आणि तज्ज्ञ मनुष्यबळ अद्याप पुरेसे उपलब्ध नाही. त्यामुळे भारत जपान, दक्षिण कोरिया, तैवान, अमेरिका आणि चीन यांसारख्या देशांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. विशेषतः तैवानकडे सुमारे ६५ टक्के उत्पादन क्षमता असून या क्षेत्रात त्यांचे वर्चस्व आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्सही सरकारच्या सहकार्याने देशाचे परावलंबित्व कमी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात डॉ. पुजेरी यांनी विद्यापीठाच्या संशोधनाभिमुख शिक्षण धोरणाची माहिती दिली. कुलगुरू डॉ. राजेश एस. यांनी प्रगत तंत्रज्ञान शिक्षण व उद्योगसहकार्याच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे अभियंते घडविण्याच्या ध्येयधोरणावर भाष्य केले. विश्वशांती प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात होऊन पसायदानाने सांगता झाली. डॉ. सुदर्शन सानप यांनी आभार मानले, तर प्रा. स्नेहा वाघटकर यांनी सूत्रसंचालन केले.
पुणे सेमिकंडक्टर हब बनेल – विवेक पवार
विवेक पवार यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचा कल सध्या मोठ्या प्रमाणावर सॉफ्टवेअर अभियांत्रिकीकडे आहे. मात्र, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव पाहता विद्यार्थ्यांनी कोअर अभियांत्रिकी शाखांकडे वळणे आवश्यक आहे. सध्याची गुंतवणूक पाहता सेमिकंडक्टर तंत्रज्ञान हेच भारताचे भविष्य असून आवश्यक परिसंस्था उभारल्यास बंगळुरू आणि चेन्नईनंतर पुणे हे सेमिकंडक्टर हब म्हणून विकसित होऊ शकते. त्यामुळे युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी नमूद केले.