-बंदोबस्त, सीसीटीव्ही व मिरवणूक मार्गाचे नियोजन तपासले
चिखली (महेंद्र हिवाळे: सर्व जाती-धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबा यात्रेसाठी दरवर्षी लाखो भाविक सैलानी येथे दाखल होत असतात. यंदाही यात्रा जवळ आल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने विविध विभागांच्या समन्वय बैठका घेतल्या आहेत.
त्या अनुषंगाने आज दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलीस अधीक्षक बुलडाणा श्री निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्री अमोल गायकवाड, रायपूर ठाणेदार निलेश सोळंके तसेच तत्कालीन ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी सैलानी बाबा यात्रा संदर्भात प्रत्यक्ष पाहणी केली. पिंपळगाव सरांई येथे संदल घर तसेच संदल मिरवणुकीच्या मार्गाची पाहणी करण्यात आली. मिरवणुकीच्या मार्गात असलेल्या अडचणी तात्काळ दूर करण्याबाबत ग्रामपंचायतीला सूचना देण्यात आल्या. त्यानंतर सैलानी बाबा दर्गा येथे भेट देऊन सीसीटीव्ही कॅमेरे, दर्शन रांगेचे नियोजन आणि बंदोबस्ताची तयारी यांचा आढावा घेण्यात आला. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी योग्य पोलीस बंदोबस्त तैनात करण्याबाबत ठाणेदार निलेश सोळंके यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
याशिवाय परंपरागत जळणाऱ्या होळीचे ठिकाण, झिरा परिसर तसेच भाविकांसाठी करण्यात येणाऱ्या वाहन पार्किंग व्यवस्थेचीही पाहणी करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांना व स्थानिक पदाधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. सैलानी यात्रा बंदोबस्त अधिक सक्षम व सुयोग्य पद्धतीने राबविण्यासाठी या पाहणीमुळे दिशा मिळाली असून भाविकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी पिंपळगाव सरांई येथील सरपंच पती केशव तरमले, पोलीस पाटील रामेश्वर गवते, सैलानी येथील शफिक मुजावर, रशीद मुजावर तसेच पोलीस अंमलदार राहुल जाधव, कळमकर, अख्तर शेख, काझी आदी उपस्थित होते.