-‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान शिबिर’ उत्साहात संपन्न; नागरिकांना थेट लाभ
सिंदखेड राजा (सुरेश हुसे) : राजस्व मंडळ सिंदखेड राजा अंतर्गत मौजे अंचली व पळसखेड चक्का येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान शिबिर २०२६’ मंगळवार दि. १२ फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडले. माननीय जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या सूचनेनुसार तसेच उपविभागीय अधिकारी संजय खडसे आणि तहसीलदार अजित दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिराच्या अध्यक्षस्थानी सरपंच वनिता सोळंके होत्या. प्रमुख उपस्थितीत नायब तहसीलदार प्रांजल पवार यांच्यासह महसूल व इतर विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ग्रामस्थांच्या उपस्थितीत शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या अभियानांतर्गत नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित महसूल व सामाजिक योजनांशी संबंधित कामांना गती देण्यात आली. वारस नोंदींची नोंदणी, निराधार अनुदान योजनेची पूर्णत्व प्रमाणपत्रे, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रे, उत्पन्न दाखले तसेच रेशन कार्डांचे थेट वितरण यांसारख्या सेवांचा लाभ लाभार्थ्यांना जागेवरच देण्यात आला. त्यामुळे नागरिकांना तालुका कार्यालयात वारंवार चकरा मारण्याची गरज भासली नाही आणि ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
तहसील कार्यालय सिंदखेड राजा अंतर्गत विविध विभागांचे प्रतिनिधी म्हणून श्री नागरे, श्रीमती रोकडे, श्रीमती बारवाल, श्रीमती पडघान, श्रीमती चिपडे, श्रीमती वाघ, श्रीमती जायभाये उपस्थित होते. आरोग्य विभागातून प्रवीण शिंदे, कृषी विभागातून रमेश झोरे तसेच सेतु केंद्राच्या वानखेडे मॅडम, मयूर देशमुख, प्रमोद सोळंके आणि सतीश सोळंके यांनी नागरिकांना आवश्यक सेवा पुरविल्या. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळ अधिकारी सुनील टेकाळे, ग्राम महसूल अधिकारी जी. वाय. दराडे, एम. ए. उदार, के. एल. खरात, ओ. ए. गव्हाणकर, राहुल देशमुख, संगीता निकस तसेच महसूल सेवक पांडुरंग सुरुशे, संतोष पवार आणि शरद दराडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सुरेश लिहीणार व डोंगरसिंग मेहेर यांनी केले.