-१ फेब्रुवारी रोजी मेळाव्यासह सोयरिक पुस्तिकेचे विमोचन; समाजबांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्याच्या वतीने तेली समाजाचा राज्यस्तरीय भव्य मोफत वधू–वर व पालक परिचय मेळावा तसेच सोयरिक पुस्तिकेचे विमोचन रविवार, दि. १ फेब्रुवारी रोजी जळगाव जामोद येथे आयोजित करण्यात आले आहे. या मेळाव्यास तेली समाजातील वधू–वर, पालक व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष रमेश आकोटकार यांनी केले आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत माणूस स्वतःच्या आयुष्यात गुरफटून सामाजिक भान हरपत चालला आहे. सामाजिक मेळावे, संस्कार शिबिरे यांपासून समाज दूर जात आहे. राजकारण, व्यवसाय व नोकरीत स्थिर झालेल्यांना वेळेचा अभाव भासतो. परिणामी समाजातील अनेक वधू–वर असूनही अपेक्षांमधील तफावत व संवादाच्या अभावामुळे विवाह जुळवताना अडचणी निर्माण होत आहेत. तेली समाज हा पारंपरिकपणे उद्योग व व्यवसायाशी निगडित असून आज अनेक युवक स्वतःचा व्यवसाय उभारून दरमहा हजारो ते लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत. अनेक युवक पुणे, मुंबईसारख्या शहरांत नामांकित कंपन्यांमध्ये अभियंते म्हणून कार्यरत आहेत. अनेक वेळा व्यवसायातून मिळणारे उत्पन्न हे नोकरीपेक्षा कितीतरी अधिक असते. तरीही बहुतांश पालक आपल्या मुलीसाठी केवळ नोकरदार वराचाच आग्रह धरताना दिसतात. यामुळे नेमके काय करायचे आणि काय टाळायचे, याचे भान समाज म्हणून हरपत चालले आहे. हा वधू–वर परिचय मेळावा केवळ ओळख करून देण्यासाठी नसून, समाजातील नाती, संबंध व विश्वास दृढ करण्याचा एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. सुखाच्या धाग्यातून समाजाची घट्ट माळ विणली जावी, हाच या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. रमेश आकोटकार यांनी सुई हातात घेतली असून, धागा एकत्र आणून माळ तयार करण्याची जबाबदारी समाजबांधवांची आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या मेळाव्याचे उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते होणार असून विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे प्रदेशाध्यक्ष व माजी खासदार रामदास तडस, महाराष्ट्र भाजपाचे महामंत्री तथा तेली महासंघाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, अकोला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व ओबीसी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बालमुकुंद भिरड, अमरावती जिल्हा शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेंद्र दिवटे, तेली महासंघाचे अकोला जिल्हाध्यक्ष भूषण भिरड, शुभम सुरेश खाडे उपस्थित राहणार आहेत. यावेळी नगरसेवक प्रशांत नायसे (खामगाव), नगरसेविका सौ. गायत्रीताई खेडकर (नांदुरा), नगरसेवक रोशन पांडव (नांदुरा), नगरसेवक रविंद्र उमाळे (शेगाव), नगरसेविका सिमाताई देव्हडे (चिखली), नगरसेविका विमलताई देव्हडे (चिखली) आणि नगरसेविका सौ. संध्याताई गवात्रे (तेल्हारा) यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी या राज्यस्तरीय वधू–वर परिचय मेळाव्यास तेली समाजातील सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रमेश आकोटकार, नंदकिशोर काथोटे आणि संजय चोपडे यांनी केले आहे.