-मेहकर तालुक्यात शिवसेना उबाठाची संघटनात्मक ताकद झपाट्याने वाढतेय
-आमदार सिद्धार्थ खरातांच्या नेतृत्वात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते बांधले शिवबंधन!
बुलढाणा / मुंबई (बाळू वानखडे): मेहकर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वाखाली पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढताना दिसत आहे. ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावरच मेहकर तालुक्यातील काँग्रेसचे मातब्बर नेते व उद्योजकांनी शिवसेना उबाठात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
दि. २४ जानेवारी रोजी मुंबई येथील मातोश्री निवासस्थानी मेहकर तालुक्यातील तीन माजी सरपंचांसह हिवरा खुर्द येथील उद्योजक ॲड. गणेश देवकर व इतर मान्यवरांनी आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले. या प्रवेशामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठाला मोठे बळ मिळाल्याचे मानले जात आहे. यामध्ये जानेफळचे माजी उपसरपंच गणेश पाखरे, काँग्रेसचे जानेफळ सर्कल प्रमुख तथा उटीचे माजी सरपंचपती संजय सुळकर, सोनाटीचे माजी सरपंच डॉ. शेषराव बदर, उद्योजक ॲड. गणेश देवकर, नागेश शिंगणे (कळंबेश्वर), राजेंद्र महाराज तळेकर आदींचा समावेश आहे. हे सर्व काँग्रेस पक्षातील निष्ठावान व प्रभावशाली कार्यकर्ते मानले जात होते. आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नियोजनातून नुकत्याच झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना उबाठाचे उमेदवार किशोर गारोळे विजयी झाल्यानंतर पक्षसंघटना अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे तालुक्यात शिवसेनेत प्रवेश घेणाऱ्यांची रिघ लागल्याचे दिसून येत आहे.
या प्रवेशप्रसंगी शिवसेना नेते विनायक राऊत, आमदार मिलिंद नार्वेकर, रवी म्हात्रे, नगराध्यक्ष किशोर गारोळे, तालुका प्रमुख निंबाजी पांडव, संजय वडतकर, युवा सेना तालुका अधिकारी आकाश घोडे, डॉ. सार्थ खरात तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना योग्य सन्मान व जबाबदारी दिली जाईल, तसेच संघटन मजबूत करण्यासाठी त्यांचा सक्रिय सहभाग घेतला जाईल, असे आश्वासन आमदार सिद्धार्थ खरात यांनी यावेळी दिले.