-अत्यल्प हप्त्यात विमा सुरक्षा; कंत्राटी कामगारांसाठी दिलासादायक पाऊल
पुणे (अर्जुन मेदनकर): पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी २५ लाख रुपयांचा वैयक्तिक अपघात विमा उतरविण्यात आला आहे. याच धर्तीवर पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांसाठीही वैयक्तिक अपघात विमा संरक्षण मिळावे, यासाठी मुख्य कामगार अधिकारी श्री. नितीन केंजळे यांनी विमा कंपनीकडे विशेष पाठपुरावा केला होता.
त्यास अनुसरून न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या शासकीय विमा कंपनीने केवळ २७० रुपये इतक्या अत्यल्प रकमेमध्ये कंत्राटी कामगारांसाठी १० लाख रुपयांचा वैयक्तिक अपघात विमा देण्याचा प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावानुसार पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी मनुष्यबळ पुरविणाऱ्या सर्व ठेकेदारांची बैठक घेऊन कंत्राटी कामगारांचा वैयक्तिक अपघात विमा उतरविण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार अनेक ठेकेदारांनी आपल्या कंत्राटी कामगारांचा विमा उतरविला आहे.
दरम्यान, मे. सिद्धीविनायक एन्टरप्रायजेस या पुणे महानगरपालिकेस कंत्राटी कामगार सेवा पुरविणाऱ्या संस्थेतील कंत्राटी कामगार कै. निवांत दशरथ अवसरे यांचे गावी जात असताना अपघातात निधन झाले. सदर कामगारास वैयक्तिक अपघात विम्याचे संरक्षण असल्याने पुणे महानगरपालिका व संबंधित ठेकेदार संस्थेच्या संयुक्त प्रयत्नातून विमा दावा मंजूर करून घेण्यात आला. दि. २१ जानेवारी २०२६ रोजी दिवंगत कामगाराच्या पात्र वारसास १० लाख रुपयांचा विमा धनादेश अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज.) मा. पवनीत कौर (भा.प्र.से.) यांच्या हस्ते दिवंगत कामगाराची पत्नी सौ. साक्षी निवांत अवसरे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्य कामगार अधिकारी श्री. नितीन केंजळे, उप कामगार अधिकारी श्री. बुगप्पा कोळी, ठेकेदार संस्थेचे प्रोप्रायटर श्री. दादासाहेब झेंडे तसेच दिवंगत कामगाराची पत्नी व वडील उपस्थित होते.