-बाळसमुद्र आश्रुबाबा जन्मोत्सव महाप्रसाद वितरण
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : येथून जवळच असलेल्या बाळसमुद्र येथे श्री आश्रुबाबा यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
बाळसमुद्र येथे आश्रुबाबा यांचा जन्मोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, युवासेना नेते योगेश जाधव, भाग्यश्री खेडेकर, माजी कृषी सभापती दिनकरराव देशमुख, माजी समाजकल्याण सभापती बाबूराव मोरे, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव तसेच भाजपाचे नेते शंकरराव उगलमुगले यांच्या प्रमुख उपस्थितीत महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
आश्रुबाबा यांच्या पवित्र पावलांनी बाळसमुद्र गाव धार्मिक कार्याकडे प्रवृत्त झाले आहे. ज्या-ज्या गावात अशा थोर विभूतींचे वास्तव्य राहिले, त्या त्या भागातील लोकांना त्यांनी चांगला उपदेश दिला. आज या जन्मोत्सव सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले. सामाजिक कार्यासाठी जे काही योगदान लागेल, ते मी सदैव करण्यास तत्पर राहीन. भविष्यात येथे अधिक मोठ्या प्रमाणावर जन्मोत्सव साजरा व्हावा, यासाठीही माझे सहकार्य लाभेल, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी केले. या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त बाळसमुद्र, शेंदुर्जन, गोरेगाव, साखरखेर्डा व दरेगाव येथील हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी सुमारे ११ क्विंटल गहू, ७ क्विंटल वांगी भाजी आणि २ क्विंटल प्रसाद तयार करण्यात आला होता. त्यानंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.