-सह्याद्री देवराई फाउंडेशन व पुणे जिल्हा परिषद यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम रुजवण्याचा प्रयत्न
आळंदी (अर्जुन मेदनकर) : पुणे जिल्हा परिषद व सह्याद्री देवराई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खेड तालुक्यातील धानोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वृक्षारोपण व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला सह्याद्री देवराई फाउंडेशनचे संस्थापक तथा सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. आजचे विद्यार्थी हेच उद्याच्या सक्षम महाराष्ट्राचे व सक्षम भारताचे आदर्श नागरिक घडणार असल्याने त्यांच्या मनात निसर्गाविषयी आदराची भावना निर्माण करणे व पर्यावरण संवर्धनाचे संस्कार रुजवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा उद्देश सफल झाल्याचा आनंद पुणे जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी व्यक्त केला. या अभिनव उपक्रमाला सह्याद्री देवराई फाउंडेशनचे संस्थापक सयाजी शिंदे, आयुष मंत्रालयाचे तांत्रिक सल्लागार साहेबराव मेंगडे, गटशिक्षण अधिकारी अमोल जंगले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.