-८ टिप्पर जप्त; १ कोटी ६२ लाखांचा मुद्देमाल ताब्यात, ८ जणांवर गुन्हा
बुलढाणा (सुरेश हुसे) : जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात प्रशासनाने कंबर कसली असून, मलकापूर तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातून खुलेआम वाळूची लूट करणाऱ्या वाळू माफियांवर अखेर धडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत ८ टिप्पर आणि १६ ब्रॉस वाळू जप्त करत तब्बल १ कोटी ६२ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून, ८ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या आदेशानुसार तसेच उपविभागीय अधिकारी मलकापूर संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने बुधवारी सायंकाळी केली. दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळच्या सुमारास पोलीस स्टेशन एमआयडीसी मलकापूर हद्दीतील मौजा नरवेल, कोटेश्वर मंदिर शिवारात पेट्रोलिंग सुरू असताना जमुनापुरी घाटातून मलकापूरकडे शासनाचा महसूल बुडवत अवैध वाळू वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलीस पथकाने तहसीलदार, महसूल कर्मचारी व पंचांना सोबत घेऊन तात्काळ नाकाबंदी केली. नाकाबंदी दरम्यान संशयास्पदरीत्या येणाऱ्या ८ टिप्पर वाहनांची तपासणी केली असता, चालकांकडे कोणतीही वैध परवानगी नसल्याचे उघड झाले. पंचासमक्ष तपासणीत प्रत्येकी सुमारे २ ब्रॉस याप्रमाणे एकूण १६ ब्रॉस वाळू (अंदाजे किंमत २ लाख रुपये) तसेच प्रत्येकी सुमारे २० लाख रुपये किमतीची ८ टिप्पर वाहने जप्त करण्यात आली. अशा प्रकारे एकूण १ कोटी ६२ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस स्टेशन एमआयडीसी मलकापूर, दसरखेड भाग–०५ येथे गुन्हा अप. क्र. १७५/२०२५ अन्वये कलम ३०३(२) भा.न्या.सं. तसेच कलम २१(१) व २१(२) गौण खनिज अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये मलकापूर येथील ६, नांदुरा व मोताळा येथील प्रत्येकी एक अशा एकूण ८ जणांचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या टिप्पर वाहनांचे क्रमांक MH-28-BB-6174, 2895, 4414, 4172, 1210, 8910, 7935 व 7397 असे आहेत. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान, अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहील, असा थेट इशारा प्रशासनाने वाळू माफियांना दिला आहे.