-आमदार श्वेता महाले पाटील यांची ‘झिरो टॉलरन्स’ भूमिका
चिखली (महेंद्र हिवाळे) : येथील जलप्रकल्पात झालेल्या कथित भ्रष्टाचाराबाबत चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना ठामपणे मांडली होती. या लक्षवेधीवर उत्तर देताना संबंधित खात्याचे मंत्री संजय राठोड यांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करून तीन महिन्यांत चौकशी अहवाल सादर केला जाईल आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही सभागृहात दिली होती.
मात्र या प्रकल्पाचे काम ज्या वॉटर फ्रंट प्रा. लि. कंपनीकडे आहे, ती कंपनी पुन्हा एकदा अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपली कातडी वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र समोर येत आहे. मुळात भ्रष्टाचार हाच ‘कार्यसिद्धांत’ असलेल्या या कंपनीने राज्यभरात अशाच पद्धतीने अधिकाऱ्यांशी संगनमत करून गैरप्रकार केल्याचे आरोप आमदार श्वेता महाले पाटील यांनी लक्षवेधीद्वारे संपूर्ण राज्यासमोर मांडले होते. राज्यस्तरावर विधानसभेत प्रकरण उघड झाल्यानंतर, सारंगवाडी प्रकल्पात पूर्वी प्रत्यक्षात न केलेल्या कामांची देयके आधीच काढण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. आता त्याच कामांना घाईघाईने हात घालून SIT चौकशी ‘मॅनेज’ करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संशय व्यक्त होत आहे. चौकशीचा कालावधी संपण्यापूर्वी कागदोपत्री त्रुटी झाकण्यासाठी कामे पूर्ण केल्याचे भासवणे, हा स्पष्टपणे पुरावे नष्ट करण्याचा प्रकार असल्याचा आरोप स्थानिक पातळीवर होत आहे.
या संपूर्ण प्रकरणावर आमदार श्वेता महाले पाटील यांची अत्यंत बारकाईने नजर असून, कंपनीचा खरा हेतू उघड करण्यासाठी त्यांनी आज स्वतःची टीम प्रकल्पस्थळी पाठवून प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला. कोणती कामे आधीच देयकांमध्ये दाखवण्यात आली होती आणि कोणती कामे आता केवळ चौकशीच्या भीतीने केली जात आहेत, याचा तपशीलवार हिशेब ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. आमदार महाले यांनी स्पष्ट मागणी केली आहे की, पूर्वी झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी पूर्ण झाल्याशिवाय उर्वरित कोणतीही कामे करण्याची परवानगी देऊ नये. तसेच, लक्षवेधी मांडल्यानंतर सुरू झालेल्या प्रत्येक कामावर विशेष लक्ष ठेवून चौकशी टाळण्यासाठी कोणती कामे केली जात आहेत, याची स्वतंत्र नोंद घ्यावी.
“भ्रष्टाचार हाच ज्या कंपनीचा सिद्धांत आहे, त्यांना मोकळे सोडणार नाही. ज्या कामांचे पैसे आधीच लाटले गेले, तीच कामे आता चौकशी टाळण्यासाठी पूर्ण करण्याचा प्रयत्न हा जनतेच्या डोळ्यात धूळफेक आहे. जोपर्यंत मूळ भ्रष्टाचाराची सखोल चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत या कंपनीला कोणतेही काम करू देऊ नये,” असे ठाम मत आमदार श्वेता महाले पाटील यांनी व्यक्त केले. भ्रष्टाचाराबाबत ‘झिरो सहनशीलता’ ही आमदार श्वेता महाले पाटील यांची ठाम भूमिका असून, कोणताही दबाव, संगनमत किंवा कागदी दिखावा चालू दिला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला आहे. सारंगवाडी जलप्रकल्पातील प्रत्येक रुपयाचा हिशेब आणि प्रत्येक कामाची सत्यता जनतेसमोर आणलीच जाईल, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.