– काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची नामोल्लेख टाळून आ. श्वेताताई महाले यांच्यावर टीका!
– चिखलीत काँग्रेसची नगरपरिषद निवडणूक आढावा बैठक उत्साहात
– चिखलीत मला काँग्रेसचाच नगराध्यक्ष हवा : हर्षवर्धन सपकाळ
चिखली (राजेश लोखंडे) – चिखलीत माय- मावल्यांना आता केव्हाही उखाणे घ्यावे लागत आहेत. त्यात भरीस भर म्हणून पुरुषमंडळीही उखाणे घेताना दिसत आहे. कुठलीही पूर्तता न करता, लाव फोटो अन् कर भूमिपूजन असा प्रकार सुरु आहे. शनिवार, रविवारी कार्यालयात बोलावून जनतेला वेठीस धरल्या जात आहे. एकंदरीत चिखलीत आमदार पदाचे थैमान असल्याची जोरदार टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्यावर त्यांचा नामोल्लेख टाळून केली. भारतीय जनता पक्ष हा देशातील नागरिकांना मोजत नाही, माणसा-माणसांमध्ये दरी निर्माण करण्याचे काम पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस करत आहे. भाजपाने लोकशाही नेस्तानाबूत करत हुकुमशाही सुरू केली असून, चिखलीतील सुसंस्कृत राजकारण लयास गेले आहे. महाराष्ट्राचा नगरपालिकेच्या निवडणुकीचा नारळ मी चिखलीतून फोडत असून, चिखलीत मला काँग्रेसचाच नगराध्यक्ष हवा, असा ठाम निर्धारदेखील हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.
रविवार, दि. ९ नोव्हेंबररोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात चिखली नगरपरिषद निवडणूक पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसची आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, प्रेमाने आदराने बोलणारा राहुलभाऊ बोंद्रे सारखा जिल्हाध्यक्ष बुलढाण्याला लाभला आहे. त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया होवूनही ते रात्रीचा दिवस करत पक्षसंघटनेला प्राधान्य देत आहे. जिल्ह्याची जबाबदारी मी घेतो, असे सांगणारे ते कर्तव्यदक्ष अध्यक्ष आहेत, त्यांच्यापाठीमागे चिखलीकरांनी उभे राहून चिखलीत काँग्रेसचाचा झेंडा फडकवा, आणि त्या सत्काराची संधी मला द्या, असे आवाहनही हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. याप्रसंगी बुलडाणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे, बुलडाणा जिल्हा पक्ष निरीक्षक राजेंद्र राख, प्रदेश सचिव रामविजय बुरूगंले, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सौ. मंगलाताई पाटील, विद्यार्थी सेलचे जिल्हाध्यक्ष शैलेश खेडकर यांच्यासह चिखली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष, शहर अध्यक्ष, आजी माजी जिल्हा परिषद, सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, विविध सेल व विभागाचे अध्यक्ष, पदाधिकारी, तसेच कॉग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
स्थानिक स्वराज्य संस्थात प्रशासकराज लावून भाजपाने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नको होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तब्बल चार वर्षानंतर निवडणुका होत आहे. सत्ताधार्यांनी शहराच्या स्वच्छतेचा कचरा केला असून, भ्रष्टाचाराचा निधी कोणाच्या घरात गेला? असा प्रश्न जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केला. शहराच्या स्वच्छतेचे कंत्राट ७५ लाखांवरुन अडीच कोटीवर नेण्यात आले. स्वामी विवेकानंदाचे स्मारक, छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचे सौंदर्यीकरण, विविध रस्त्यांच्या ठेक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे राहुल बोंद्रे यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यात काँग्रेसचा झेंडा फडकवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.