– मेहकर शहरातील हृदयद्रावक प्रकार; मेहकर पोलिसांची उडाली तारांबळ!
मेहकर/बुलढाणा (राजेश लोखंडे) – मेहकर शहरातील जानेफळ रोडवर झोपडीवजा पालव टाकून राहणार्या कुटुंबासोबत मानवतेलाही लाजवेल अशी हृदयद्रावक घटना घडली आहे. उघड्यावर गुजरान करणार्या भटक्या समाजातील दीड वर्षांच्या चिमुकलीची तब्येत बिघडल्याने तिचा मृत्यू झाला होता. त्याच दिवशी रात्री तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र खड्डा नीट खोल न खोदल्याने परिसरातील मोकाट कुत्र्यांनी तो खड्डा उकरून त्या चिमुकलीचा मृतदेह बाहेर काढून तिच्या शरीराचे लचके तोडल्याचा हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे.
याबाबत मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार वेंकटेश्वर आलेवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहकर ते जानेफळ रोडवर झोपडीवजा पालव ठोकुन गुजरान करणार्या भटक्या जातीच्या कुटुंबातील दीड वर्षीय बालिकेची प्रकृती गुरुवार दि. ६ नोव्हेंबर रोजी अचानक बिघडल्याने तिला मेहकर शहरातील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी दुसरीकडे हलविण्याचा सल्ला दिला. उपचारासाठी त्या चिमुकलीला नेत असताना रस्त्यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबीयांनी शोकाकुल मनाने त्याच रात्री जानेफळ रोडला लागून असलेल्या महानुभाव पंथाच्या श्मशानभूमीजवळ तिचे अंत्यसंस्कार केले. मात्र खड्डा नीट न खोदल्या गेल्याने मृतदेह पूर्णपणे झाकला गेला नाही. परिणामी, रात्री उशिरा परिसरातील मोकाट कुत्र्यांनी तो खड्डा उकरून प्रेत बाहेर काढून त्याचे लचके तोडले. दुसर्या दिवशी सकाळी परिसरातील काही नागरिकांना मानवी अवयवांचे तुकडे पडलेले दिसल्याने शहरात एकच खळबळ उडाली. याची माहिती स्थानिक पोलीसांना मिळताच ठाणेदार आलेवार यांच्यासह पोलीस पथक, श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. तपासानंतर हा प्रकार घातपाताचा नसून, अंत्यसंस्कार करताना झालेल्या निष्काळजीपणा मुळे ही दुर्घटना घडल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, सामाजिक संस्थांनी तसेच प्रशासनाने अशा भटक्या कुटुंबांना योग्य मार्गदर्शन आणि मदत करावी, अशी मागणी केली आहे.