– आज रात्रीच शिर्डी मुक्कामी पोहोचले; शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात
– शिर्डी शहरात ड्रोन उड्डाणास बंदी; सुजय विखे, विवेक कोल्हेंच्या राजकीय करिअरला मिळणार बूस्ट!
शिर्डी (विशेष प्रतिनिधी) – देशाचे गृह आणि सहकार मंत्री अमित शाह हे अहिल्यानगर जिल्हा दौर्यावर आले असून, आज रात्रीच शिर्डीत मुक्कामासाठी ते पोहोचले हाेते. उद्या (दि.५) त्यांच्याहस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन पार पडणार आहे. रविवारी सकाळी साईदर्शनानंतर लोणी गावात विखे पाटील साखर कारखान्याच्या विस्तारित प्रकल्पाचे उद्घाटन आणि पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे व पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर भव्य सभा पार पडणार आहे. त्याचबरोबर कोपरगाव येथे कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या देशातील पहिल्या सीएनजी प्रकल्पाचे उद्घाटन शाह यांच्याहस्ते होणार आहे. पूरपरिस्थितीनंतर शाह हे पहिल्यांदाच महाराष्ट्रात दौरा करत असताना नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदतीबाबत महत्त्वाची घोषणा करतील का, याकडे सर्व शेतकर्यांचे लक्ष लागून आहे. शाह यांचा हा दौरा उत्तरेतील राजकीय समिकरणे बदलविणारा ठरणार का, हेदेखील पहावे लागणार आहे. विधानसभा निवडणुकीत माजी खासदार सुजय विखेंच्या नेतृत्वात जिल्ह्यात महायुतीचे अनेक आमदार निवडून आले. त्यामुळे अमित शाह या दौऱ्यात सुजय विखे यांचे पुनर्वसनाची घोषणा करणार का? अशी चर्चा असून, मागील विधानसभा निवडणुकीत विवेक कोल्हे यांनी महायुतीच्या उमेदवारासाठी थांबण्याचा निर्णय घेतल्याने, विवेक कोल्हेंसाठी काही खास घोषणा गृहमंत्री अमित शाह करणार का? याची कोल्हे समर्थकांना उत्सुकता लागली आहे.
केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह हे रविवारी (दि. ५) राहाता व कोपरगाव तालुक्याच्या दौर्यावर येत आहेत. लोणी येथे शाह यांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे हे शिर्डी ते लोणी मोटारीने प्रवास करण्याची शक्यता गृहीत धरून रस्त्यांच्या दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू होते. या दौर्याच्या पार्श्वभूमीवर राहाता व कोपरगाव तालुक्यात ड्रोन उडविण्यास दोन दिवस बंदी घालण्यात आल्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने आज काढले होते. अमित शाहांच्या या दौऱ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री पंकज भोयर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्री बाळासाहेब पाटील, मंत्री जयकुमार गोरे आदींसह महायुतीचे खासदार, जिल्ह्यातील आमदार आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शनिवारी गोव्यातून रात्री नऊ वाजता शिर्डी विमानतळावर पोहोचणार असून, त्यानंतर शिर्डीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवण व मुक्काम करणार आहे. 5 ऑक्टोबर रोजी सकाळी साई समाधी मंदिरात दर्शनासाठी जाणार असून, त्यानंतर मोटारीने लोणी येथे पोहोचणार आहे. तेथे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ते करतील. विखे कारखान्याच्या विस्तारित प्रकल्पाचे शुभारंभ शहांच्या हस्ते होईल. त्यानंतर उपस्थितांना ते संबोधित करतील.कार्यक्रमानंतर विखे पाटलांच्या निवासस्थानी जेवण करून दुपारी हेलिकॉप्टरने कोपरगावला पोहोचणार असून, संजीवनी कारखान्याच्या विविध प्रकल्पांचे शुभारंभ त्यांच्या हस्ते होईल. त्यानंतर अमित शाह उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करणार असून, कार्यक्रम आटोपून हेलिकॉप्टरने शिर्डी विमानतळ येथे पोहोचून विमानाने दिल्लीच्या दिशेने रवाना होणार आहेत.