– दारूबंदीसह अवैध धंद्यांविरोधात अंढेरा पोलिसांनीही दिले कठोर कारवाईचे संकेत
– दारूबंदीसाठी मिसाळवाडी गावातील महिला एकवटल्या!
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) – गावातील अवैध दारूविक्रीमुळे तसेच अवैध धंद्यांमुळे गोरगरीबांचे संसार उद्ध्वस्त होऊन तरूणपिढी नशेच्या अधिन झाल्याने, तसेच गावात दररोज भांडणतंटे होत असल्याने मिसाळवाडी ग्रामपंचायतीने दारूबंदीसह अवैध धंदे बंद करण्यासाठी ठराव घेऊन सदर ठराव अंढेरा पोलिस ठाणे, दारूबंदी विभाग व तहसीलदारांना दिला आहे. गावातील दारूविक्री रोखण्यासह सर्व प्रकारचे अवैध धंदे सक्तीने बंद केले जातील, अशी निसंदिग्ध ग्वाही ठाणेदार रूपेश शक्करगे यांनी मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील, उपसरपंच हनुमान मिसाळ यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी यांना दिली. क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे युवा नेते सुनील मिसाळ यांच्यासह गावातील महिलांनी दारूबंदीसाठी आक्रमक भूमिका घेतली होती.
गावातील दारूबंदीसह अवैध धंदे बंद करण्यात यावे, अशी मागणी मिसाळवाडी येथील महिलांनी केली होती. तशी सूचना वंदना अशोक मिसाळ यांनी ग्रामसभेत मांडली तर गजानन सीताराम सुरडकर यांनी या सूचनेला अनुमोदन दिले. त्यानुसार सर्वानुमते एकमुखाने गावात दारूबंदीसह अवैध धंदे बंद करण्याचा ठराव पारीत करण्यात आला. या ठरावाची प्रत अंढेरा पोलिस ठाण्याचे ठाणेदार रूपेश शक्करगे यांना देण्यात आली आहे. गावातील दारूविक्रीसह सर्व प्रकारचे अवैध धंदे सक्तीने बंद केले जातील, अशी निसंदिग्ध ग्वाही, ग्रामपंचायतीला ठाणेदारांनी दिली. गावातच नाही तर शिवारातसुद्धा दारूविक्री चालू ठेवली जाणार नाही, अशी ग्वाहीसुद्धा ठाणेदारांनी सुनील मिसाळ यांच्यासह सरपंच बाळू पाटील, उपसरपंच हनुमान मिसाळ यांच्यासह महिला मंडळाला दिली.
मिसाळवाडी ग्रामपंचायतीचा ठराव वाचण्यासाठी य़ेथे क्लीक करा..
गावात मोठ्या प्रमाणात अवैध गावठी दारूविक्री होत होती. त्यामुळे गावातील तरूणपिढीदेखील व्यसनाच्या आहारी गेली होती. गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होत होते. त्यामुळे गावातील महिला-भगिनींनी आक्रमक भूमिकादेखील घेतली होती. गावाला नशामुक्त करण्यासाठी ग्रामपंचायतीने सर्वानुमते दारूबंदीसह अवैध धंदे बंदीसाठी ठराव केला असून, या ठरावाची प्रत तालुका दंडाधिकारी, दारूबंदी विभागासह अंढेरा पोलिसांना दिला आहे. अंढेरा पोलिसदेखील वारंवार छापे टाकून ग्रामस्थांना सहकार्य करत आहेत.
– बाळू पाटील, सरपंच मिसाळवाडी