– शेतकर्यांना मदतीसाठी साई संस्थान शिर्डी व गजानन महाराज संस्थान शेगावकडून प्रत्येकी एक कोटी रूपयांचा निधी!
– श्री गजानन महाराज संस्थानकडून पूरग्रस्तांसाठी १ कोटी ११ लाखांची मदत!
मुंबई/बुलढाणा (सुरेश हुसे) – अतिवृष्टीच्या संकटात सापडलेल्या शेतकर्यांसाठी शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थान व शिर्डी येथील साईबाबा संस्थान धावून आले आहे. या दोन्हीही संस्थानकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांच्या मदतीसाठी प्रत्येकी एक कोटी रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्त करण्यात आला आहे. या निधीतून शेतकर्यांचे थोडे का होईना आश्रू पुसले जातील, असा या संस्थानला विश्वास आहे. या संस्थानसह इतरही देवस्थाने व संस्थाने शेतकर्यांच्या मदतीला धावून येत आहेत.
शिर्डीच्या साईबाबा संस्थानने आपल्या सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण दाखवून संकटग्रस्त शेतकर्यांसाठी मदतीचा हात पुढे केला. साईबाबा संस्थानने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटी रूपये दिले आहेत. या निधीचा वापर राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीवर तातडीने मदत पुरवण्यासाठी केला जाणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीला मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकर्यांचे घरदार विस्कळीत झाले आहेत. अशा वेळी साईबाबा संस्थानने आपल्या सामाजिक बांधिलकीचा परिचय देत मदत जाहीर करणे महत्वाचे ठरले आहे.
दुसरीकडे, यंदा महाराष्ट्रभर कोसळलेल्या अवकाळी पावसाने व अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत श्री गजानन महाराज संस्थान, शेगांव (पब्लिक ट्रस्ट रजिस्ट्रेशन नं. ए-२५० बुल) या न्यासामार्फत पूरग्रस्तांसाठी १ कोटी ११ लाख रूपयांचा सहयोग निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आला. दि. २७ सप्टेंबररोजी हा धनादेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द करण्यात आला. श्री संस्थानने या मदतीद्वारे आपली सामाजिक बांधिलकी जोपासत सेवाकार्यात भरीव योगदान दिले आहे. यामुळे समाजजीवनात आध्यात्मिकतेसोबतच सामाजिक जबाबदारीचे दर्शन घडल्याचे स्थानिकांनी नमूद केले.
शिर्डीत पावसामुळे मोठा पूर, शहर जलमय!
दरम्यान, शिर्डीत काल रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शहर पूर्णपणे जलमय झाले आहे. कालिका नगरमधील काही घरांमध्ये पाणी घुसले असून, नगर ते मनमाड महामार्गापर्यंत परिसर पाण्याखाली आहे. पावसाने काही वेळ विश्रांती घेतल्याने पाणी ओसरण्यास सुरूवात झाली आहे. तसेच, शिर्डीत रात्री दोनजण ओढ्यात वाहून गेले होते, मात्र प्रशासनाने त्यांना वाचवले आहे.