दुसरबीड महसूल मंडळातील राहेरी बुद्रूक परिसरातील शेतकरी अडचणीत!
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – तालुक्यातील दुसरबीड महसूल मंडळात काल, दि २७ सप्टेंबररोजी दिवसभर संततधार पाऊस कोसळत होता. तर राहेरी बु. परिसरात मध्यरात्री दोन वाजता मुसळधार पावसाने हाहाकार माजविला. पावसाच्या जोरदार तडाख्यामुळे येथील अल्पभूधारक शेतकरी समाधान गवई यांच्या शेतामध्ये साचलेल्या पाण्यामुळे संपूर्ण सोयाबीन पीक जलमय झाले असून, शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
“मी मेहनतीने उभं केलेलं सोयाबीन पूर्णपणे पाण्याखाली गेलंय. आता उरलं-सुरलं काही वाचेल असं वाटत नाही. आम्हाला तातडीने मदत मिळाली नाही तर हातचं पोट चालवणंही अवघड होईल,” अशी हाकाटी समाधान गवई यांनी केली. याचबरोबर, स्थानिक शेतकरी बांधवांनीही रोष व्यक्त केला. “दरवर्षी पावसामुळे नुकसान होतं, पण पंचनाम्यासाठी कोणी वेळेवर येत नाही. अधिकारी फक्त कागदावर दाखल होतात. शेतकऱ्यांची खरी परिस्थिती कोणी पाहायला येत नाही,” अशी टीका नागरिकांनी केली. शेतकऱ्यांना मदतीची निकड भासत असून तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी एकमुखाने मागणी होत आहे.