– एक गाय होरपळून मृत्यूमुखी; गहू, शेती अवजारे, औषधे, पाईप्स, मोटारीसह संपूर्ण गोठा खाक; तहसीलदारांच्या उपस्थितीत पंचनामा!
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – तालुक्यातील जळगाव येथील खातेदार विष्णु हरीभाऊ वाघ यांच्या मालकीच्या गट क्रमांक ८२ मधील गोठ्याला काल दि. १६ जुलै रोजी संध्याकाळी ७.३० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत दोन वर्षांची एक गाय जळून मृत्युमुखी पडली असून, गहू, शेती उपयोगी साहित्य, औषधे, पाईप्स, पंप, मोटारी, खताची पोती आदींसह अंदाजे 6 लाख 30 हजार रुपयांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच आज दि. 17 जुलै रोजी तहसीलदार श्री. अजित दिवटे, ग्राम महसूल अधिकारी आर बी जाधव, जळगाव, ग्रामसेवक ए. बी. नागरे, गावचे सरपंच व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. जळून मृत्युमुखी पडलेली गाय – वय २ वर्ष,गहू – २५ क्विंटल, स्प्रिंकलर पाईप – ६० नग, पी.व्ही.सी. पाईप – ५० नग, सिमेंट – १० पोती, पेट्रोल व डिझेल पंप – २ नग, पाण्याचे डिझेल इंजिन – २ नग, इलेक्ट्रिक मोटार – २ नग, स्टार्टर – २ नग, इलेक्ट्रिक वायर – १५०० फूट, खताच्या बॅगा – ३७ पोते, कीटकनाशक औषधे – अंदाजे ७-८ हजार रुपये किमतीची, प्लास्टिक ड्रम, पत्रे – ३० नग, शेती अवजारे – विविध, कंपाऊंड जाळी – ५० फूट, ताडपत्र्या – २ नग, खुराडे – २ नग, दोरखंड (सोल) – ५०० फूट, थिबक सिंचन बंडल – २५ नग, पिव्हसी पाईप –५० नग. ही आग नेमकी कशामुळे लागली हे स्पष्ट झाले नसले तरी संपूर्ण गोठा व त्यातील शेतमाल, साहित्य, पंपिंग यंत्रणा आगीने खाक झाली असून, शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, अशी ग्रामस्थ व शेतकऱ्यांची मागणी आहे.