– आजअखेर उपयुक्त साठा ६७.८० द.ल.घ.मी.; धरणाच्या जीवंत साठ्यात पाणी पोहोचल्याने शेतीसाठी आशेची पालवी!
ऊळगावराजा/सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या जलस्रोतांपैकी एक असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पात पाण्याची नोंदणीय आवक सुरू झाली असून, आजच्या (३० जून) सकाळी ६ वाजेच्या नोंदीनुसार धरणाच्या पाणीसाठा पातळीने ५१६.४४ मीटर गाठली आहे. धरणाच्या पूर्ण संचय पातळी ५२०.५० मीटर असून, यामध्ये ६७.८०२६ दशलक्ष घनमीटर (द.ल.घ.मी.) उपयुक्त साठा उपलब्ध झाला आहे.
धरणाची एकूण साठवण क्षमता ९३.४०४० द.ल.घ.मी. इतकी असून, सध्या साठा केवळ ०.६४ टक्के आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या जिवंत साठ्यात पाणी पोहोचले असून, यामुळे शेतकर्यांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. आज दिवसभरात २ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली असून, आजअखेर एकूण १७८ मिमी पाऊस झाल्याची माहिती कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, बुलढाणा यांनी दिली आहे.
दरम्यान, सर्व वक्रद्वारे सध्या बंद असून, धरणातून कोणत्याही प्रकारचा विसर्ग सुरू नाही. पावसाचा जोर कायम राहिल्यास आगामी काही दिवसांत धरणातील पाणीसाठा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीसच धरणात पाण्याची आवक झाल्याने सिंचनाचा विचार करणार्या शेतकर्यांसाठी ही आनंदाची बातमी असून, येत्या काळात अधिक पाऊस झाल्यास खरीप हंगामासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
https://x.com/i/status/1938173277266186542