– प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह मान्यवर राहणार उपस्थित
– काँग्रेस सोडण्यासाठी काठावर बसलेल्या नेत्यांच्या घरातच सभेचे नियोजन
खामगाव/बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – खामगावसारख्या बालेकिल्ला राहिलेल्या भागात काँग्रेसला ऊर्जितावस्था देण्यासाठी व काँग्रेस सोडण्यासाठी काठावर जाऊन बसलेल्या नेत्यांना सूचक इशारा देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राजकीय रणनीती आखल्याचे दिसून येत आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने शनिवारी (दि.२६ एप्रिल) खामगाव येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत भव्य सद्भावना संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा यशस्वी करण्यासाठी काँग्रेस जोराने कामाला लागली आहे.
गेल्या काही दिवसांपासून समाजातील जातीय तसेच धार्मिक विद्वेष वाढत चालला आहे. दहशतवादी हल्ल्यांमध्ये निष्पाप नागरिकांचा बळी जात असून, देशाच्या शत्रूंकडून सुरक्षिततेला आव्हान दिल्या जात आहे. तसेच अनेक माणुसकीला काळिमा फासणार्या घटना घडत असून, देश व महाराष्ट्र अस्थीर करण्याचे काम केल्या जात आहे. समाज एकसंघ असावा, तिथे जातीय तसेच धार्मिक द्वेषाला, तिरस्काराला काहीही महत्त्व असू नये, हेच काँग्रेसचे उद्दिष्ट राहले आहे. त्यामुळेच समाजातील वाढत्या विद्वेषाला प्रेमभावनेचे उत्तर देण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने संविधान बचाव व सद्भावना रॅली, सभेचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने येत्या २६ एप्रिल २०२५ रोजी खामगाव येथील संत तुकाराम महाराज सभागृह, नांदुरा रोड येथे सकाळी १० वाजता प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत भव्य सद्भावना संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, माजी आमदार राहुल बोंद्रे तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रभारी कुणाल चौधरी, बुलढाणा जिल्हा निरीक्षक राजेंद्र राख, आमदार धीरज लिंगाडे यांचेसह काँग्रेस पदाधिकार्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी सद्भावना सभेचे उद्दिष्ट, काँग्रेसचे आगामी काळातील ध्येय, धोरण व आगामी निवडणूक संदर्भात प्रदेशाध्यक्षांसह प्रमुख पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी या सद्भावना संकल्प सभेस बुलढाणा जिल्ह्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी ज्ञानेश्वर दादा पाटील यांनी केले आहे.
दरम्यान, ३० एप्रिलला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचा खामगाव दौरा असून, या दौर्यात काँग्रेस नेते तथा माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होऊ शकतो, अशी एक चर्चा सद्या जोरात सुरू आहे. त्यापूर्वीच, काँग्रेसची भव्य सभा खामगावात होत असून, या सभेतून काँग्रेस जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असल्याचीही चर्चा होत आहे.