– दहशतवादाचा कायमचा बिमोड करावा – राहुल बोंद्रे
चिखली/बुलढाणा (राजेश लोखंडे) – जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी भारताला कधीही भरुन न निघाणारी जखम दिली. पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी विविध राज्यातून काश्मीर पाहायला आलेल्या पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत २६ पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेकजण रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. या नृशंस हल्ल्याचा भाजप व काँग्रेस पक्षाकडून निषेध करण्यात आला असून, चिखली शहरात दहशतवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. भारतमातेच्या सुपुत्रांचा बळी घेणार्यांना करारा जबाब मिलेगा, असा इशारा भाजपच्या स्थानिक नेत्यांनी दिला, तर देशाची एकता आणि अखंडता खंडित करणार्या दहशतवादाचा केंद्र सरकारने कायमचा बिमोड करावा, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केले. भाजपने काल तर काॅंग्रेसने आज (दि.२४) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर निषेध आंदाेलन केले.
भिकार झालेला शेजारी देश आणि त्यांना देशातून समर्थन देणारे देशद्रोही, धर्मद्रोही यांनी शांत, समृद्ध आणि विकसित होत चाललेल्या भारत भूमीचा अखंड भाग असलेल्या जम्मू आणि काश्मीरला अशांत करून भारताची प्रतिमा मलीन करण्यासाठी धार्मिक आतंकवाद्यांच्या सहाय्याने जे अघोषित “धर्मयुद्ध” भारत मातेच्या सुपुत्रांचा बळी घेऊन सुरू केले आहे. त्या देशातील व देशाबाहेरील सर्व आतंकवाद्यांना.करारा जवाब मिलेगा, अशा भावना याप्रसंगी भाजप नेत्यांनी व्यक्त केल्या. काल, चिखली शहर भाजपच्यावतीने पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या भारत मातेच्या वीर सुपुत्रांना चिखली येथे श्रध्दांजली वाहण्यात आली, तसेच हे नृशंन्स हत्याकांड घडवून आणणाऱ्या पाकिस्थान व दहशतवाद्यांचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
देशातील सर्व लोक या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत आहेत. हे दहशतवादी हल्ले समाजात फूट पाडण्यासाठी आणि ध्रुवीकरण करण्यासाठी रचले गेले आहेत. आम्ही सर्व भारतीयांना एकत्र राहण्याचे आणि सांप्रदायिक सलोखा व शांतता राखण्याचे आवाहन करतो. समाजात तेढ वाढणार नाही याची आपण सारे काळजी घेऊ या, असे आवाहनही जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी याप्रसंगी केले. भ्याड हल्ला करणारे अतिरेकी भारतात आले कसे? त्यांना शस्त्र कसे मिळाले? ते परत कसे जाऊ शकले? यासारखे प्रश्न उपस्थित करून कठोर कारवाई करण्याची मागणी राहुल बोंद्रे यांनी केली. अतिरेकी धार्मिक तेढ निर्माण करतात मग ते देशातील असो की देशाबाहेरील. मानवतेला काळिमा फासणार्यांना केंद्र सरकारने धडा शिकवावा, आम्ही भारतीय म्हणून त्यांच्या पाठीशी असल्याचेही राहुल बोंद्रे म्हणाले.