पुणे (प्रतिनिधी) – भारत बंद दरम्यान दुकान बंद करण्यास नकार दिल्याने, काही लोकांनी दमदाटी केली, याविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेलेल्या फिर्यादीसच पोलिसाने मारहाण व शिवीगाळ केली होती. उलट त्याच्यावरच गुन्हे दाखल केले होते. या अन्यायाविरोधात जिल्हा न्यायालयात धाव घेतल्यानंतर, जिल्हा व सत्र न्यायालयाने संबंधित पोलिसाविरोधात अॅट्रोसिटी तसेच भारतीय दंडविधानानुसार गुन्हे दाखल करण्याचे आदेश कोंढवा पोलिसांना दिले आहेत.
सविस्तर असे, की १० जूनरोजी काही राजकीय पक्षांनी भारत बंद पुकारला होता. त्या दिवशी दुकान का चालू ठेवले म्हणून, कोंढवा येथील बाळासाहेब भगवान म्हस्के यांना काही लोकांनी दमदाटी, शिवीगाळ केली होती. त्याविरोधात म्हस्के हे फिर्याद देण्यासाठी कोंढवा पोलिस ठाण्यात गेले होते. त्यांनी नारायण लोणकर, महादेव बाबर, आणि इतर ८ ते १० लोकांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आपल्या तक्रारीवरून या लोकांविरोधात गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी म्हस्के यांनी केली. परंतु, पोलिसांनी गुन्हा दाखल तर केला नाही, उलट म्हस्के यांनाच मारहाण केली व जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच, दुसर्या दिवशी म्हस्के यांच्याच विरुद्ध भादंविच्या ३५३ कलमान्वये गुन्हे दाखल केले.
या अन्यायाविरोधात म्हस्के यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली. तसेच, अटकपूर्व जामीन मिळवत, मारहाण करणार्या पोलिसाविरोधात अॅट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली. प्रसिद्ध विधीज्ज्ञ तोसिफ शेख, क्रांती शहाणे, स्वप्नील गिरमे, दीपक गायकवाड, मोहम्मद शेख, महेश गवळी, शिवानी गायकवाड, नुपूर अरगडे, राम लोणारे पाटील या नामवंत वकिलांनी म्हस्के यांची जोरदार बाजू मांडली. तसेच, म्हस्के हे कसे पोलिसी अत्याचाराचे बळी आहेत, याचे पुरावेच सादर केले. जोरदार युक्तिवाद व पुरावे पाहाता, जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. ए. रामटेके यांनी कोंढवा पोलिसांना संबंधित आरोपी पोलिसाविरोधात अॅट्रोसिटी कायद्यान्वये तसेच भारतीय दंडविधानानुसार गुन्हे दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले आहेत.