-गणेशोत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन; चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न
आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील गणेश मंदिर, श्री दत्तनगर प्रतिष्ठान प्रांगणात धनश्री हॉस्पिटल, मोशी, अग्रवाल आय हॉस्पिटल, मोशी आणि आळंदी चऱ्होली डॉक्टर्स असोसिएशन (ACDA) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिरासह गणेशोत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी स्वकाम सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सारंग जोशी, आळंदी नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार कुऱ्हाडे पाटील, डॉ. निलेश रंधवे, डॉ. मनीषा रंधवे, आळंदी चऱ्होली डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. ज्योत्स्ना आवारी, महिला बचत गट महासंघाच्या अध्यक्षा सुवर्णा बंडू नाना काळे, सुलतानभाई शेख, हमीद शेख, गोविंद ठाकूर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. आरोग्य शिबिरामध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी सर्वसाधारण आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी तसेच विविध आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. आधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने नागरिकांची तपासणी करण्यात आली. परिसरातील नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
समाजभूषण सन्मानाने कर्तृत्वाचा गौरव
कार्यक्रमाचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे ‘समाजभूषण सन्मान’ सोहळा. समाजहित, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि जनसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आळंदी परिसरातील विविध मान्यवरांचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्याचा परिचय उपस्थितांना करून देण्यात आला. विविध क्षेत्रांत प्रेरणादायी योगदानाबद्दल अर्जुन मेदनकर, अर्चना घुंडरे, गौतम पाटोळे, आरती मोरे, रवींद्र गव्हाणे, अनिल वहिले, अंजना खेडकर, रुख्मिणी मोरे आणि आरिफ शेख यांना ‘समाजभूषण सन्मान’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या सन्मानामुळे समाजसेवकांच्या कार्याला प्रोत्साहन मिळाले.
बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
डॉ. सोनवणे लहान मुलांचे व दातांचे हॉस्पिटल यांच्या वतीने लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अनेक बालकांनी उत्साहाने सहभाग घेत आपल्या कल्पकतेचे आणि कलागुणांचे प्रदर्शन केले. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांचेही कौतुक करण्यात आले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आळंदी चऱ्होली डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. ज्योत्स्ना आवारी, उपाध्यक्ष डॉ. निखिल सोनवणे, सचिव डॉ. सचिन सुदडे, सहसचिव डॉ. अशोक रहाणे, खजिनदार डॉ. रविंद्र बदरखे, सहखजिनदार डॉ. अमोल देवकर, दत्तनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश कुऱ्हाडे यांच्यासह आळंदी चऱ्होली डॉक्टर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी धनश्री हॉस्पिटल, अग्रवाल आय हॉस्पिटल, आळंदी चऱ्होली डॉक्टर्स असोसिएशन, श्री दत्तनगर प्रतिष्ठान, डॉक्टर, स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच उपस्थित नागरिकांचे विशेष सहकार्य लाभले, असे डॉ. ज्योत्स्ना आवारी यांनी सांगितले. या वेळी विविध मान्यवरांनी मनोगते व्यक्त करून उपक्रमाचे कौतुक केले आणि मार्गदर्शन केले. आळंदी चऱ्होली डॉक्टर्स असोसिएशनच्या आरोग्यविषयक कार्याचा तसेच दत्तनगर प्रतिष्ठानच्या सामाजिक उपक्रमांचा मान्यवरांनी गौरव केला. कार्यक्रमाच्या समारोपात श्री गणेश आरती आणि पसायदान झाले. उपस्थित मान्यवरांचा दत्तनगर प्रतिष्ठानच्या वतीने श्रीफळ व प्रसादभेट देऊन सत्कार करण्यात आला. आरोग्य जनजागृती, प्रेरणादायी व्यक्तींचा गौरव आणि बालकांच्या कलागुणांना प्रोत्साहन या तीन उद्देशांची सांगड घालणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला.