-गुलाल-पुष्पांची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला; आठ सार्वजनिक मंडळांचा विसर्जन सोहळा उत्साहात
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : येथील श्री गणेशाचे वाजतगाजत आणि मोठ्या उत्साहात गुलाल-पुष्पांची उधळण करीत बालगोपाल गणेश मंडळासह आठ सार्वजनिक गणेश मंडळांच्या श्रींचे विसर्जन शांततेत पार पडले. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
सकाळी ९ वाजेपासून बालगोपाल गणेश मंडळाने स्थापन केलेल्या श्री गणेशाची वाजतगाजत आणि भक्तिभावपूर्ण मिरवणूक काढण्यात आली. दुपारी १ वाजेपर्यंत विसर्जन सोहळा पार पडला. विशेष म्हणजे बालगोपाल मंडळाचे कार्यकर्ते येणाऱ्या-जाणाऱ्या वयोवृद्ध व्यक्ती तसेच महिलांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेत होते. बालगोपाल गणेश मंडळात किमान १० मंडळे सहभागी झाली होती. कोणताही पोलिस बंदोबस्त नसतानाही मिरवणुकीत येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अडचण निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्यात आली. गुलाल व डीजेचा वापर न करता पारंपरिक वाद्यांच्या साथीने मिरवणूक काढण्यात आली. दुपारी १ वाजेपर्यंत बालगोपाल मंडळांनी विसर्जन आटोपले. दुपारी २ वाजता संत संताजी जगनाडे महाराज चौकातून मुख्य विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. महात्मा ज्योतिबा फुले गणेश मंडळ अग्रस्थानी होते. त्यानंतर अहिल्याबाई होळकर गणेश मंडळ, परदेशी गणेश मंडळ, बालनाथ गणेश मंडळ, श्री शिवाजी व्यायाम शाळा गणेश मंडळ, संत रोहिदास गणेश मंडळ, हिंदू सूर्य महाराणा प्रताप गणेश मंडळ आणि श्री शिवाजी हायस्कूल गणेश मंडळ मिरवणुकीत सहभागी झाले. अनेक मंडळांनी डीजेमुक्त मिरवणुकीत सहभाग घेतला. महात्मा ज्योतिबा फुले गणेश मंडळाच्या वतीने बल्लखामवरील खेळाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
दुपारी २ वाजता सुरू झालेली विसर्जन मिरवणूक दगडी मशीद, गुजरी चौक, गणपती चौक, अहिल्याबाई होळकर नगर, रोहिलपुरा आणि महात्मा ज्योतिबा फुले नगर मार्गे भोगावती नदीवर पोहोचली. तेथे गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खाडे आणि ठाणेदार युवराज रबडे यांच्या मार्गदर्शनाखाली दंगा काबू पथक, एसआरपी पथक, राखीव पोलिस दल तसेच स्थानिक पोलिस स्टेशनअंतर्गत पोलिस आणि होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली.