– रविवारी दिल्लीत काँग्रेसचे आंदोलन, सोमवारी राज्यात राष्ट्रवादीचे आंदोलन
नवी दिल्ली (प्रतिनिधी) : लष्कराच्या कंत्राटी भरती योजनेविरोधात देशभर आगडोंब उसळल्यानंतर सारवासारव करण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तीनही सैन्यदलांच्या प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत तीनही दलांच्या भरतीत अग्निवीरांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. तरीही, बिहारसह १० राज्यांतील तरुणवर्ग या कंत्राटी भरतीला तीव्र विरोध करत असून, हिंसक आंदोलन सुरुच आहे. दरम्यान, महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची युवा शाखाही या मुद्द्यावरून चांगलीच आक्रमक झाली असून, २० जूनरोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने महाराष्ट्रभर अग्निपथ योजनेच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वर्पे यांनी सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्रात या योजनेच्या विरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत. अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत आहे. बिहारसह अनेक ठिकाणी तरुणांकडून हिंसक निदर्शने केली जात आहेत. वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ होत आहे. ही चळवळ हळूहळू तीव्र होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत आता त्याची आग महाराष्ट्रातही पोहोचली आहे.
दरम्यान, यापूर्वी केंद्रीय गृहमंत्रालयाने सीआरपीएफ, आसाम रायफल्समधील भरतीत १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तसेच, वयोमर्यादेतही तीन ते पाच वर्षांची सवलत देण्याचे सूतोवाच केले होते. दुसरीकडे, आजदेखील उत्तर भारतात तीव्र आंदोलने चालूच असून, तरुणांनी रेल्वेला आगी लावल्या तर महामार्ग रोखून आपला निषेध व्यक्त केला. युवक काँग्रेसच्यावतीने रविवारी दिल्लीतही आंदोलन केले जाणार आहे.
‘अग्निवीरां’ना लष्करी भरतीत १० टक्के आरक्षण