आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : सद्यस्थितीत खालावत चाललेला राजकारणाचा दर्जा सुधारण्यासाठी विधायक विचार घेऊन युवक तरुणांनी लोकशाही बळकट करण्याचे आवाहन कृष्णाखोरे विकास महामंडळाचे संचालक शिवसेनेचे माजी पुणे जिल्हा प्रमुख डॉ रामशेठ गावडे पाटील यांनी केले.
सामाजिक बांधिलकीतून अनावश्यक खर्चाला फाटा देत विविध सामाजिक,शैक्षणिक कार्यक्रमाचे माध्यमातून डॉ. रामशेठ गावडे पाटील यांचा विविध संस्था,संघटना, पक्ष पदाधिकारी यांनी लोकोपयोगी कार्यक्रमातून त्यांच्या वाढदिवसाचे आयोजन केले होते. यावेळी युवक तरुणांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी शिवा संघटनेचे अध्यक्ष सदाशिव साखरे, यशवंत संघर्ष सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब कवळासे, प्रकाश बनकर, आळंदी जनहिताचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, नेचर फाऊंडेशनचे अध्यक्ष भागवत काटकर, पोलीस वेल्फेअर फाउंडेशनचे सल्लागार संतोष दीक्षित, पुणे जिल्हा अध्यक्ष अविनाश धनवे, कार्याध्यक्ष किरण कोल्हे, माऊली घुंडरे, सतीश गुंड, गोविंद तौर, सचिन सोळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विविध संघटनांनी केलेल्या सत्कारास उत्तर देताना गावडे पाटील म्हणाले, सर्व सामान्य कार्यकत्यास काम करताना त्यांचे कार्यास न्याय देण्याचा प्रयत्न सद्यस्थितीत होताना दिसत नाही. राजकारणाचे स्वरूप अलीकडच्या काळात फार खालावत चाललेले आहे. दर्जा देखील खालावला आहे. यामुळे निकोप लोकशाही साठी, लोकशाही टिकविण्यासाठी विचारवंत पुढे आले पाहिजेत. यात युवक तरुणांनी प्रभावी भूमिका घेण्याची हीच वेळ असून त्यांनी भविष्यातील लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी सक्रिय भूमिका घेण्याचे आवाहन करीत गावडे यांनी युवक तरुणांशी सुसंवाद साधला. यावेळी नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष भागवत काटकर आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.