– पाणी सोडण्याबाबत आवश्यकतेनुसार निर्णय घेणार
– अतिवृष्टी, लंपी आजारत जनावरे दगावली, शेतकर्यांना तातडीने मदत देणार – पालकमंत्री
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्यातील विविध प्रकल्पामधील पिण्याच्या पाण्याचे आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. दुष्काळी परिस्थितीमध्ये खडकपूर्णामधून पूर्णा नदीमध्ये पाणी सोडण्यात येणार असून, इतर बाबींसाठी पाणी सोडण्यासाठी आवश्यकतेनुसार निर्णय घेण्यात येणार आहे. शाळा व स्मशानभूमीसाठी प्राधान्याने निधी देणार असून, अतिवृष्टी, लंपी आजाराने जनावरे दगावलेल्या शेतकर्यांना तातडीने मदत देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा गतिमान केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक आज पार पडली. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, आमदार किरण सरनाईक, डॉ. संजय रायमूलकर, संजय गायकवाड, श्वेता महाले, विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, मुख्य कार्य अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड आदी उपस्थित होते. या बैठकीला तीनच आमदार हजर राहिले तर इतर आमदारांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. ना.पाटील म्हणाले, जिल्हा नियोजनच्या सर्वसाधारणमधून ३२६ कोटी. विशेष घटक योजनेतून १४ कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेतून १०० कोटी असा एकूण ४४० कोटी रूपयांचा निधी यावर्षी उपलब्ध होणार आहे. विकासकामे पूर्ण करण्यासाठी पाच महिन्यांचाच कालावधी राहिलेला असल्यामुळे कामे होण्यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी. जिल्ह्याचा विकास करण्यासाठी यावर्षीच्या कामांवरील स्थगिती उठविण्यात आली आहे. विभागांना दिलेला संपूर्ण निधी खर्च व्हावा, यासाठी परिपूर्ण नियोजन करण्यात यावे. कामे पूर्ण करण्यासाठी कालावधी कमी असला तरी ही कामे गुणवत्तापूर्ण होण्यावर भर द्यावा. जिल्ह्यात शाळा आणि स्मशानभूमीची कामे हाती घेण्यात यावी. केवळ एकाच बाबीवर लक्ष केंद्रीत करून खर्च केल्यास त्याचा परिणाम होण्यास मदत होणार आहे.
जिल्हा नियोजनच्या सर्वसाधारणमधून 326 कोटी. विशेष घटक योजनेतून 14 कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेतून 100 कोटी असा एकूण 440 कोटी रूपयांचा निधी. विकासकामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी-पालकमंत्री गुलाबराव पाटील
जिल्ह्यातील खारपाण पट्ट्यातील गावे जलजीवन मिशनमध्ये घेण्यात यावी. पावसाचे मोजमाप योग्य होत नसल्याने शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळण्यास अडचण होत आहे. ही बाब लक्षात घेता पावसाचे मोजमाप करणारी यंत्रणा सक्षम करण्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून यातून पाऊस मोजमाप करणारी यंत्रणा उभारण्यात येणार आहे. याची देखभाल आणि दुरूस्तीही योग्यप्रकारे करण्यात येणार आहे. लंपी आजारामुळे जनावरे दगावली असल्यास शासनाच्या निर्देशानुसार शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. जिल्ह्यातील शेतकर्यांना ही मदत व्हावी, यासाठी पंचनाम्याची गती वाढविण्यात यावी. शेतकर्यांना अतिवृष्टीची मदत आणि शेतीचे नुकसान झाल्यास पीकविम्याची रक्कम मिळण्यासाठी गतीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही पाटील यांनी यावेळी दिल्या.
———————