– मंत्री सत्तारांच्या उपदव्यापामुळे अख्खा शिंदे गट बॅकफुटवर!
बुलढाणा (एकनाथ माळेकर) – राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार व राज्यातील जबाबदार महिला नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अश्लाघ्य भाषेत टीका केल्यानंतर, जनमाणस प्रचंड संतप्त झालेले आहे. आज जिल्हाभरात सत्तार यांच्या पुतळ्याचे दहन करत ठीकठिकाणी त्यांच्या पुतळ्याला जोडे-चपला हाणण्यात आल्या. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील उद्रेक पाहाता, मंत्री सत्तार यांनी आज (दि.८) सिंदखेडराजा तालुक्यात पूर्वनियोजित कार्यक्रमांना हजेरी लावणे टाळले. बुलढाणेकरांच्या आक्रमकतेला मंत्री सत्तार चांगलेच घाबरल्याचे दिसून आले. याबाबत नियोजित सिंदखेडराजा दौरा का रद्द केला, याबाबत त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांना फोन केला असता, त्यांचा फोनही स्वीचऑफ येत होता. तर त्यांच्या निकटवर्तीय सूत्राने साहेब सद्या अज्ञातवासात असल्याचे स्पष्ट केले.
खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्धल केलेल्या बेताल वक्तव्यामुळे चौफेर टीकेचे धनी ठरलेले कृषिमंत्री अब्दुल सत्तार आता ‘बॅकफूट’वर गेले आहेत. लोकांच्या संतप्त भावना, त्यातही बुलढाणा जिल्ह्यातील उग्र आंदोलने पाहाता, मंत्री सत्तार यांनी आजचा त्यांचा सिंदखेडराजाचा नियोजित दौराच रद्द केला. ते मंगळवारी बुलढाणा जिल्ह्याच्या दौर्यावर होते. सकाळी सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळाचे दर्शन घेणार होते. त्यानंतर चांगेफळ येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावणार होते. मात्र, सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने सत्तारांना जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिला होता. त्याला घाबरून सत्तार यांनी त्यांचा दौराच रद्द केला.
मंत्री अब्दुल सत्तार यांनी काल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर काही वेळातच सॉरी म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मुंबई आणि औरंगाबाद येथील घरासमोर निदर्शने केली. घरावर दगडफेक केली. वाढता प्रक्षोभ पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे कान टोचले. तसेच पुन्हा माफी मागण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर त्यांनी सिल्लोड येथील जाहीरसभेत पुन्हा दिलगिरी व्यक्त केली. आता त्यांना अज्ञातवासात राहण्याच्या सूचना दिल्याचे समजते. ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत.
सत्तार यांच्या वक्तव्याचे बुलढाणा जिल्ह्यातही हिंसक पडसाद उमटले. माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी सत्तार यांना मंत्रिमंडळातून काढण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. बुलढाणा तालुका राष्ट्रवादीने तर जोपर्यंत माफी नाही तोपर्यंत जिल्हा बंदीचा इशारा दिला. अशातच, मंत्री सत्तार यांचा ८ तारखेचा जिल्हा दौरा जाहीर झाला. तो केवळ सिंदखेडराजा तालुक्यापुरता मर्यादित होता. मंगळवारी सकाळी १० वाजता मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यातील जिजाऊ जन्मस्थळाचे ते दर्शन घेणार होते. राजमातेच्या दर्शनानंतर ते चांगेफळ येथे आयोजित भागवत सप्ताहाला हजेरी लावून सिल्लोडकडे कूच करणार होते. मात्र, आजही शांत न झालेल्या राजकीय वादळामुळे त्यांनी हा दौराच रद्द केला. यामुळे मंत्री सत्तार आणि बुलढाणेकर जनता यांच्यातील संघर्ष टळला आहे. दरम्यान, हाती आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कान टोचल्यानंतर सत्तार यांनी आजचा बुलढाणा जिल्ह्यातला दौरा रद्द केला असल्याचे वृत्त आहे.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद बुलढाण्यातही उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून बुलढाण्यात सत्तार यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तर सिंदखेडराजात टायर जाळून रास्ता रोको करण्यात आला. संग्रामपुरातही सत्तारांविरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले.
सत्तारांचा राजीनामा घ्या, राष्ट्रवादीची राज्यपालांकडे मागणी
अब्दुल सत्तारांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही समर्थन केले नाही. शिवाय, सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यपालांची भेट घेत त्यांना निवेदन दिले व सत्तार यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली. तसे न झाल्यास कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. आणखी प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीनुसार, मंत्री अब्दुल सत्तार हे सिंदखेडराजा येथे आले असते तर त्यांच्यावर हल्ला होण्याची भीती होती. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तार यांना अज्ञातवासात जाण्याच्या सूचना देत, दौरा रद्द करण्याचे आदेश दिलेत, अशी गोपनीय माहितीही सूत्राकडून मिळाली आहे.
——————-