मेहकर (तालुका प्रतिनिधी) – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे फायरब्रँड युवानेते तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे हे येत्या ७ नोव्हेंबरला मेहकरात जाहीर सभा घेऊन ‘प्रताप’गडाला जोरदार हादरे देण्याची शक्यता आहे. बुलढाणा व मेहकर येथे त्यांच्या सभेची जोरदार तयारी शिवसेनेकडून सुरू असल्याची माहिती शिवसेना (ठाकरे) सूत्राने दिली आहे. बुलढाणा व मेहकरात अभूतपूर्व शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.
शिवसेना बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात शिवसेनेचे फायरब्रँड नेते तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे हे जाहीर सभा घेऊन बंडखोरांवर तोफ डागत आहेत. तसेच, शिवसेनेतील बंडखोरीनंतर दुभंगलेल्या शिवसेनेला बळ देण्याचे काम पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे जोमाने करत आहेत. त्यादृष्टीने लवकरच मेहकरात जाहीर सभा घेण्याचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच जाहीर केलेले आहे.
आता युवानेते आदित्य ठाकरे हे पुढील सोमवारी, ७ नोव्हेंबररोजी बुलडाणा जिल्हा दौर्यावर येत असल्याची माहिती शिवसेनेतील वरिष्ठस्तरीय सूत्राने दिली असून, मेहकर आणि बुलडाणा या दोन ठिकाणी आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. यावेळी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड, मेहकरचे आमदार संजय रायमुलकर व खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर ते तोफ डागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या सभेकडे आतापासूनच जिल्हावासीयांचे लक्ष लागलेले आहे.
—————-