– राजकीय पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून, शेतकरी म्हणून एकत्र येण्याचे आवाहन
मेहकर/चिखली (तालुका प्रतिनिधी) – परतीचा पाऊस व अतिवृष्टीमुळे मेहकर, चिखली, लोणार, बुलढाणा तालुक्यांतील अनेक गावांतील सोयाबीन, कापूस, तूर, मका, आदि पिकांसह भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे, प्रशासन मात्र नुकसान नसल्याचे सांगून पंचनामे करण्यास टाळाटाळ करीत आहे. पीकविमा नुकसानीचे अर्ज ७२ तासाच्या आत केले, परंतु १५ दिवस उलटूनही कंपनीच्या मनमानी कारभारामुळे अजूनही पंचनामे झालेले नाहीत. यासाठी नुकसानग्रस्त शेतकर्यांना शेतीपिकांचे नियम, अटी न लावता पंचनामे करून तात्काळ १०० टक्के मोबदला देण्यात यावा, सोयाबीन, कापसाला भाव मिळावा, यासाठी मोठी लढाई उभी करणे गरजेचे असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मेहकर व चिखली तालुक्यांत बैठकांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
याच अनुषंगाने चिखली तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकर्यांची व सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकर्यांची तातडीची बैठक शनिवारी (दि.१५) चिखली येथील शासकीय विश्रामगृह येथे दुपारी दोन वाजता येथे आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीला प्रमुख मार्गदर्शन करण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर उपस्थित राहणार आहेत.
या शिवाय, रविवारी (दि.१६) रोजी मेहकर तालुक्यांत बैठकांचे आयोजन करण्यात आले असून, सायंकाळी ६ वाजता पिंपळगाव उंडा, सायंकाळी साडेसात वाजता लव्हाळा तर रात्री साडेआठ वाजता मोहखेड येथे बैठकांचे आयोजन करण्यात आले असून, शेतकरी नेते रविकांत तुपकर हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी या बैठकांना शेतकरी, नुकसानग्रस्त व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले, युवा नेते गणेश गारोळे यांनी केले आहे.