चिखली (विशेष प्रतिनिधी) – चिखली आणि बुलढाणा तालुक्यात परतीच्या संततधार पाऊस आणि झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. उभी पिके पाण्यात असल्याने सोयाबीनला कोंब फुटले आहे. त्यामुळे शेतकर्यांचे खूप नुकसान झालेले असल्याने झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी आर्थिक मदत देण्याची मागणी आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे. आज आमदार महाले यांनी बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची मंत्रालयातील त्यांच्या दालनात भेट घेतली, व त्यांना शेतकर्यांच्या परिस्थितीबाबत अवगत केले. यावेळी तालुका अध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ हेदेखील उपस्थित होते.
मागील वर्षी प्रमाणेच यावर्षी सुद्धा सोयाबीनच्या शेंगा भरल्यानंतर काढणीच्या वेळीच सप्टेंबरपासून जोरदार पाऊस सुरू झाल्याने चिखली आणि बुलडाणा तालुक्यात शेतीपिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. कुठे ढगफुटीसारखा तर कुठे कमी पण सततचा पाऊस पडून पिके जलमय झाल्याने शेतकर्यांचे सोयाबिनला कोंब फुटत आहे. उभी पिके सडत आहे. निसर्गाचा लहरीपणा सोसणार्या शेतकर्यांना आज सर्वाधिक गरज आहे ती आर्थिक मदतीची आणि नुकसान भरपाईची. चिखली आणि बुलढाणा तालुक्यात परतीचा संततधार पाऊस आणि अतिवृष्टीने अतोनात नुकसान झालेले आहे. उभी पिके पाण्यात असल्याने सोयाबीनला कोंब फुटले आहेत. मात्र ६५ मिलिमीटर पावसाचा निकष दाखवत प्रशासन नुकसानीचे पंचनामे करण्यास टाळाटाळ करत आहे. नुकसान मोठे असल्याने सरसकट पंचनामे करून शेतकर्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्याकडे आमदारांनी केली आहे.
महसूल यंत्रणेकडून ६५ मिमी पावसाचा हेका, आमदारांनी केली पालकमंत्र्यांकडे तक्रार!
– सरकारने अतिवृष्टीसाठी ६५ मिलीमीटर पावसाचा निकष बदलला तरी प्रशासनाची पंचनामे करण्यास टाळाटाळ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने एनडीआरएफच्या मदतीच्या निकषात बदल केला. ६५ मिलीमीटर पावसाचा निकषही हटवला. आर्थिक मदत दोन हेक्टरवरून तीन हेक्टर केली. आर्थिक मदतीत वाढ केली. परंतु प्रशासन अजूनही पंचनामे करण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे सततचा पाऊस पडून झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी आमदार श्वेताताई महाले यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे. गणपतीमध्ये पाऊस सुरू झाला. संपूर्ण पितृपक्षातही पाऊस पडला. नवरात्र जरा कोरडे गेले असले तरी ऑक्टोबर महिन्यात पावसाने अधिक जोर धरला आहे. तीन चार दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी वादळी वार्यासह पाऊस पडत आहे. मागील महिन्यात धाड, मासरुळ, रायपूर मंडळात पाऊस झाला. ११ ऑक्टोबर रोजी हिवरा नाईक, किन्ही नाईक, इसोली या भागात ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने अतोनात नुकसान झालेले आहे. तसेच चिखली व बुलढाणा तालुक्यात अजूनही मुसळधार पावसामुळे नदी नाले एक होऊन शेतजमिनी जलमय झालेल्या आहेत. परंतु प्रशासन ६५ मिलिमीटर पाऊस पडला नसल्याचे सांगून पंचनामे करणे टाळत आहे. नदी-नाल्याकाठची पिके तर जमिनीवर पडली आहेत. वरून पावसाचा मारा असल्याने पिके सडत आहेत. परंतु अजूनही पंचनामे नसल्याने नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. पाऊस तर पिच्छा सोडत नाही. हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिसकावून घेत आहे. त्यामुळे शेतकर्यांना मदतीचा हात देणे अतिशय आवश्यक आहे, अशी भूमिकाही आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी मांडून, तातडीने मदत द्यावी, अशी मागणी पालकमंत्र्यांकडे केली आहे.