– ग्रामस्थांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, पोलिस सतर्क असल्याची दिली ग्वाही
– साखरखेर्डा येथील कालच्या घटनेत काहीही तथ्य आढळले नाही, पालकांनी आपली मुले बिनधास्त शाळेत पाठवावी – ठाणेदार आडोळे
चिखली (एकनाथ माळेकर) – सोशल मीडियावर कुठले तरी जुने व्हिडिओ शेअर केले जात असून, ग्रामीण भागात मुले पळविणारी टोळी सक्रीय असल्याचे खोटे मेसेज व्हायरल केले जात आहेत. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनजीवन भीतीच्या सावटाखाली आहे. विशेष करून चिखली, मेहकर, सिंदखेडराजा तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे, मुले पळवणारी टोळी ही निव्वळ अफवा असून, ग्रामस्थांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये, चोर समजून फेरीवाल्यांना मारहाण करू नये, पोलिस सतर्क असून, गस्त सुरु आहे, अशी माहिती चिखलीचे ठाणेदार अशोक लांडे व साखरखेर्डाचे ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी दिली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांनीही पत्र काढून असल्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन केलेले आहे.
साखरखेर्डाचे ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी सांगितले, की सध्या सर्वत्र चोर आल्याच्या अफवेने खेड्यापाड्यात मोठी भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, गावांत आलेल्या निर्दोष इसमांना मारहाण झाल्याच्या घटनात वाढ झाली आहे. नेटकरी सोशल मीडियावर जुने व्हिडिओ शेअर करून संभ्रमित करीत आहेत. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालावा. कुणी संशयास्पद आढळल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी. मुले पळवून नेणार्या टोळीची अफवा असून, काल दिनांक २१ रोजी साखरखेर्डा येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये दहावीच्या एका विद्यार्थ्याने पोलिसांना अपहरण झाल्याची माहिती दिली. दरम्यान, याची चौकशी करून त्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, सदर मुलाच्या सांगण्यात काहीही तथ्य आढळून आले नाही. पालकांनी आपली पाल्ये बिनधास्तपणे शाळेत पाठवावीत व खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये. पोलीस दक्ष असून, गेल्या पाच दिवसापूर्वी चोरीच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना अटक करण्यात आली तर एक महिन्यापूर्वी दरेगाव येथील दरोड्यातील दोन आरोपींना अटक केली. पेनटाकळी येथील मोटारपंप चोरणारे आरोपी जेरबंद केले आहे. त्यामुळे पोलीस सतर्क असून नागरिकांनी गोपनीय माहिती द्यावी, असे आवाहनही ठाणेदार आडोळे यांनी केले आहे.
तसेच, चिखली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे यांनी सांगितले, की सद्या सोशल मीडियावर मुले पळवणारी टोळी फिरत असल्याबाबत संदेश प्रसारित होत आहेत. परंतु अशा प्रकारे कोणतीही मुले पळवणारी टोळी आपल्या पोलीस स्टेशन हद्दीत नसून, नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये. गावात येणारे साधू, ज्योतिषी, फेरीवाले व इतर लोकांवर अविश्वास दाखवून त्यांना मारहाण करणे गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे अशा प्रकारचे कोणतेही कृत्य कोणीही करू नये. काही संशय वाटल्यास तात्काळ पोलीस स्टेशन चिखली अथवा डायल ११२ ला संपर्क करुन माहिती द्यावी, कोणीही अफवा पसरवून अथवा मारहाण करुन कायदा हातात घेऊ नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही लांडे यांनी दिलेला आहे.
———————–